
महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यांत आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचे विश्लेषण केले असता लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याच्या प्रमाणात फारसा बदल आढळून आला नाही, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आज देण्यात आली.
कोरोनाला बळी पडलेल्या 18 वर्षांखालील मुलांचे प्रमाण मे 2021 मध्ये सुमारे 0.07 टक्के इतके आहे यावरून लहान मुलांमध्ये या आजाराचे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. राष्ट्रीय पातळीवरील सल्लागारांनी तिसऱया लाटेत बालकांना मोठय़ा प्रमाणावर संसर्ग होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे राज्य शासनाने राज्यस्तरीय बालरोगतज्ञांचा टास्क फोर्स स्थापन केला आहे. त्याचबरोबर राज्य सरकार बालकांवरील उपचारांच्या दृष्टीने रुग्णालयस्तरावर पायाभूत सुविधा, यंत्रणा उभारण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी करीत असल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.



























































