
जवळपास दीड वर्षापूर्वी चीनच्या वुहानमधून कोरोनाचा संसर्ग जगभरात फैलावला होता. दीड वर्षानंतरही कोरोनाच्या संसर्गाला पूर्णपणे अटकाव करणे माणसाला शक्य झाले नाही. अशातच आता चीनमधून आणखी एक संकट जगावर ओढवण्याची भीती आहे. चीनमध्ये एका व्यक्तीला बर्ड फ्लूच्या विषाणूची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने याला दुजोरा दिला आहे. चीनच्या झेनजियांगमधील एका 41 वर्षीय व्यक्तीला बर्ड फ्लूच्या H10N3 या विषाणूची बाधा झाली आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीला 28 एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर एका महिन्यानंतर 28 मे रोजी या व्यक्तीच्या शरिरात H10N3 हा स्ट्रेन आढळला. या व्यक्तीला H10N3 ची बाधा कशी झाली याबाबत आरोग्य आयोगाने कोणतीही माहिती दिली नाही. संसर्गबाधित व्यक्तीची प्रकृती स्थिर असून लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना बाधा झाली नसून त्यांना कोणताही त्रास झाला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. चीनमध्ये बर्ड फ्लूचे अनेक स्ट्रेन आहेत. त्यातील काही स्ट्रेनची व्यक्तींनाही बाधा झाली आहे. पोल्ट्रीमध्ये काम करणाऱया व्यक्तीना बर्ड फ्लूच्या स्ट्रेनची बाधा होण्याची शक्यता अधिक असते.

























































