बारावीची परीक्षा घेऊन जिवाचा धोका पत्करू नये! शिक्षणतज्ञांचे स्पष्ट मत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरात बारावीचे 85 टक्के विद्यार्थी हे राज्य शिक्षण मंडळात शिकत आहेत. सीबीएसईने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक आरोग्याच्या कारणास्तव बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. सीबीएसईपेक्षा विविध राज्य मंडळांत शिक्षण घेणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने बारावीची परीक्षा घेऊन विद्यार्थी, शिक्षकांच्या आरोग्याचा धोका पत्करण्याची राज्यांना गरज नाही, असे मत शिक्षणतज्ञांनी व्यक्त केले आहे.

येत्या काही दिवसांत राज्य मंडळांनी बारावी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेणे आवश्यक आहे असे शिक्षणतज्ञांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना पदवी प्रवेशाच्या सूचना लवकरात लवकर देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. काही खासगी विद्यापीठे विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन प्रवेश परीक्षा घेण्यास सक्षम आहेत तसेच बारावीतील अंतर्गत मूल्यमापन आणि प्रवेश परीक्षेतील गुण याआधारे पदवी प्रवेश जलदगतीने पार पाडणे शक्य आहे असेही तज्ञांनी सुचवले आहे.

पदवी प्रवेशासाठी सीईटीसारख्या पर्यायांवर त्याचबरोबर केंद्रीय विद्यापीठातील प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे केंद्रीय प्रवेश परीक्षा राबवावी पिंवा त्या-त्या विद्यापीठांना प्रवेश परीक्षा घेण्याचे स्वातंत्र्य द्यावे, अशी मागणीही होत आहे.

जेईई, नीट जुलै किंवा ऑगस्टमध्ये?

सीबीएसई बोर्डाने बारावीची परीक्षा रद्द केल्यामुळे आता अनेकजण जुलै आणि ऑगस्टमध्ये जेईई, नीट प्रवेश परीक्षा घेण्याची मागणी करीत आहेत. मेडिकल आणि दंत अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणारी नीट परीक्षा 1 ऑगस्टला होणार आहे. मात्र ही परीक्षाही पुढे ढकलण्यात येईल, अशी अपेक्षा वर्तविली जात आहे.

एप्रिल, मेमध्ये होणारी जेईई मेन परीक्षा कोरोनोमुळे पुढे ढकलण्यात आली. बारावी परीक्षा जुलैमध्ये होण्याची शक्यता होती. त्यामुळे जेईई मेन सप्टेंबर, तर जेईई अॅडव्हान्स ऑक्टोबरमध्ये होणार आहे. सीबीएसईने बारावीची परीक्षा रद्द केल्याने जेईई मेन आणि नीट परीक्षा ऑगस्टच्या आधी घेणे शक्य आहे, मात्र राज्य शिक्षण मंडळांनी बारावी परीक्षेबाबत निर्णय घेतला नसल्याने जेईई, नीट परीक्षेबाबत निर्णय प्रलंबित आहे. राज्य मंडळांनी सीबीएसईचे अनुकरण केल्यास स्पर्धा परीक्षांचा मार्ग मोकळा होईल. राज्य शिक्षण मंडळ बारावीच्या परीक्षेबाबत काय निर्णय घेणार या प्रतीक्षेत एनटीए असून त्यानंतरच जेईई, नीट परीक्षांच्या तारखा जाहीर होणार आहेत.

परीक्षा घ्या किंवा रद्द करा, पण निर्णय तातडीने हवा

बारावीची परीक्षा घ्या पिंवा रद्द करा, पण निर्णय तातडीने जाहीर करा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. गेल्या दीड वर्षापासून विद्यार्थी परीक्षेची तयारी करीत आहेत. ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना सेल्फ स्टडीला भरपूर वेळ मिळाला, पण परीक्षा देण्याची संधी मिळत नसल्याने विद्यार्थी निराश झाले आहेत. दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाल्यानंतर दहावीबरोबरच बारावीचे विद्यार्थीही निश्चिंत झाले आहेत. त्यामुळे बारावीची परीक्षा देण्याचा निर्णय झाल्यास परीक्षा देण्याची विद्यार्थ्यांची मानसिकता नाही हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. काही विद्यार्थ्यांच्या मते सध्याच्या परिस्थितीत आरोग्य आणि करीयर या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत.

परीक्षा न घेण्याचा निर्णय अशैक्षणिकच

दहावी, बारावीच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय अशैक्षणिक असल्याचे मुंबई उच्च न्यायालयात दहावी परीक्षा रद्द करण्याच्या विरोधात याचिका करणारे सेवानिवृत्त शिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले. सर्वेच्च न्यायालयात गुरुवारी (उद्या) बारावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. याचिकेत परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. सर्वेच्च न्यायालयाने परीक्षा रद्द केल्या आहेत. त्यामुळे न्यायालय निर्णय काय देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्या निर्णयाआधारे मुंबई उच्च न्यायालयात दहावी परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावरही सुनावणी होणार आहे.

बारावीचे 60 टक्के विद्यार्थी त्याच कॉलेजमध्ये एफवायला प्रवेश घेतात

परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालण्यापेक्षा ती रद्द करणे योग्य ठरेल, असे ज्युनियर कॉलेज टीचर्स युनियनचे प्रा. मुकुंद आंधळकर यांनी सांगितले. बारावीनंतर 60 टक्के विद्यार्थी त्याच कॉलेजमध्ये प्रथम प्रवेश घेतात. यात कॉमर्स, आर्ट्सचे सर्वाधिक विद्यार्थी असून त्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश देण्याचे अधिकार संबंधित कॉलेजना द्यावे. 35-40 टक्के विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमार्फत पुढील अभ्यासक्रमांकडे वळतात. त्यामुळे यासंदर्भात तातडीने निर्णय झाल्यास अडचण येणार नाही, असेही आंधळकर म्हणाले.