भाजपने गैरमार्गाने बदललेल्या प्रभाग रचनेत सुधारणा करा! काँग्रेसची आता निवडणूक आयोगाकडे धाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिकेच्या 2017 च्या निवडणुकीआधी भाजपने आपल्या सत्तेच्या अधिकाराचा गैरवापर करून  प्रभाग रचना बदलली. यामुळेच भाजपला 40 ते 50 जागा जास्त मिळाल्या. त्यामुळे या 45 प्रभागांच्या रचनेत 2022 च्या निवडणुकीआधी सुधारणा करा अशी मागणी काँग्रेसने केली आहे. याबाबत काँग्रेसचे पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी राज्य निवडणूक आयुक्त यूपीएस मदान यांना पत्र दिले आहे.

पालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग आणि महापालिका यांच्यात नुकत्याच झालेल्या बैठकीत निवडणुकीच्या प्रशासकीय तयारीला लागण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने पालिकेला दिले आहेत. परिणामी कोरोना नियंत्रणात असल्यास या निवडणुका निश्चित वेळेत होण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहून भाजपने सत्तेचा वापर करून केलेली मनमानी सुधारण्याची मागणी केली आहे. भाजपने सत्तेचा गैरवापर केल्याचा प्रकार अतिशय गंभीर असून सामान्य नागरिकांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे भाजपने आपल्या राजकीय फायद्यासाठी केलेल्या 45 प्रभागांच्या पुनर्रचनेत सुधारणा करून ही चूक दुरुस्त करावी, असे रवी राजा यांनी या पत्रात म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांनाही दिले पत्र

भाजपने 2017 मधील निवडणुकीत 227 जागांची पुनर्रचना करताना आपल्या पदाचा गैरवापर केला व आपल्या सोयीप्रमाणे स्वतŠच्या पक्षाला फायदा होण्यासाठी प्रभागांची पुनर्रचना केली. त्यामुळे भाजपला 40 ते 50 जागा अधिक मिळाल्या. ही बाब नैसर्गिक न्याय तत्त्वाविरुद्ध आहे. तेव्हा काही नागरिकांनी हरकती आणि सूचनांमार्फत या पुनर्रचनेला विरोध करूनही त्यांना न्याय देण्यात आला नाही. भाजपने केलेल्या या गैरप्रकाराबाबत  रवी राजा यांनी याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनाही पत्र दिले आहे.