
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे नगर जिल्ह्यातील दूध संकलन घटले आहे. निव्वळ दूध संघ अथवा डेअरींकडून संकलित होणारे दूध संकलन 32 लाख लीटरवरून 27 लाख लीटरवर आले आहे.
शेतीला पूरक व्यवसाय म्हणून नगर जिल्ह्यातील 80 टक्के शेतकरी दुग्धव्यवसाय करतात. काहींना शेती नाही; पण दुग्ध व्यवसायात असलेल्यांची संख्याही मोठी आहे. दर दहा दिवसाला दुधाचे पेमेंट मिळत असल्याने अनेकांची आर्थिक घडी दुग्ध व्यवसायामुळे सुरळीत चालते.
दुग्ध उत्पादकांना दुधाच्या व्यवसायातून स्थैर्य प्राप्त झाले आहे. शेतीचे कोणतेही पीक घेतले तर त्याचे लगेच पैसे मिळत नाहीत. उसासारखे नगदी पीकही उशिराने पैसे देणारे आहे. त्यामुळे शेतकऱयाचा आठवडा बाजार, तसेच इतर दैनंदिन खर्च भागविणारा हा दूध धंदा आहे. हरित क्रांतीनंतर या दूध धंद्याला देशभरात चांगले दिवस आले.
नगर जिल्ह्यातील शेतकऱयांना दूधधंद्याने मोठा आधार दिला आहे. पूर्वी सहकारी संस्थांमार्फत दूध संकलन होत होते. आताही त्या आहेत, परंतु त्यांना खासगी दूध संकलन केंद्र, प्लॅण्ट यांचे आव्हान आहे. किंबहुना खासगी दूध संकलन मोठय़ा प्रमाणात होत आहे. नगर जिल्ह्यात लॉकडाऊन होण्याअगोदर 32 लाख लीटर दूध संकलन होत होते. त्यात घट झाली आहे. यावर्षी दुधाचे संकलन 27 ते 28 लाख लीटरपर्यंत खाली आले आहे.
दुधाचे दर घसरले; पशूखाद्य महागले
लॉकडाऊन असल्याने काही काम नसल्याने जनावरांच्या अतिरिक्त खुराकवर त्याचा परिणाम झाला. महागडी खाद्य घेणे शेतकऱयांना परवडत नाही. परिणामी दूध उत्पादन घटले आहे. त्यातच दुधाचे दर 32-33 रुपयांवरून 22 ते 23 रुपये इतके खाली आले आहेत. सरासरी लीटरमागे 10 रुपये शेतकऱयांना कमी मिळत आहेत. त्याचा फटकाही दूध उत्पादनावर झाला आहे. दूध पावडर, बटरचे दर कमी झाले आहेत. लॉकडाऊनमुळे चहाची दुकाने, स्वीट होम बंद आहेत. उपपदार्थ विक्री 20 टक्क्यांवर आली आहे. याचे दूरगामी परिणाम दुग्ध व्यवसायावर झाले आहेत.

























































