
कोरोनाच्या दुसऱया लाटेत नगर जिह्यात उपाययोजना करण्यात आल्या होत्या. आता तिसरी लाट येण्याची शक्यता असल्यामुळे त्याची तयारीसुद्धा प्रशासनाने सुरू केली आहे. आपल्याकडे औषधांचा साठा असून, ऑक्सिजन बेडही आहेत. आता लहान मुलांसाठी स्वतंत्र उपचार केंद्रे उभारण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. दरम्यान, सोमवारपासून नगरमधील सर्व व्यवहार सुरळीत झाले तरी नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही मुश्रीफ यांनी केले.
नगर जिह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पालकमंत्री मुश्रीफ पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदी उपस्थित होते.
हसन मुश्रीफ म्हणाले, नगर जिह्यामध्ये रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे शासनाने दिलेल्या निकषानुसार आपण आता पहिल्या टप्प्यात आलो आहोत. त्यामुळे शासनाने जाहीर केल्याप्रमाणे सोमवारपासून जिह्यातील व्यवहार सुरू होतील. याबाबत आगामी सात दिवसांमध्ये पुन्हा आढावा घेण्यात येणार असून, जर परिस्थिती ‘जैसे थे’राहिली तर आपल्याला पुन्हा मागे जावे लागेल. त्यासाठी नागरिक आणि व्यापाऱयांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
तिसऱया लाटेपूर्वी लसीकरण पूर्ण झाले पाहिजे, अशी अपेक्षा आहे. आंतरराष्ट्रीय संघटनेने 80 टक्के लसीकरण पूर्णत्वाला गेले पाहिजे असे सांगितले आहे. मुश्रीफ यांनी नगर जिह्यामध्ये आतापर्यंत सात लाख 15 हजार 142 जणांना लसीचा डोस दिला असल्याचे सांगितले. आज लस उपलब्ध होत नाही, त्यामुळे अडचणी निर्माण झालेल्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे. नगर जिह्यात लसीकरणाबाबत सावळागोंधळ निर्माण झाला असेल तर त्याची चौकशी केली जाईल. माझ्याकडे तक्रार आली तर सर्व प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी करण्यात येईल, असेही मुश्रीफ म्हणाले.
लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना धोका आहे. याची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. जिह्यामध्ये 8896 मुलांना बाधा झाल्याचे आढळून आले. आता सर्वजण बरे आहेत. मात्र, याबाबत गाफील न राहता प्रशासनाने सतर्क राहून ऑक्सिजन बेड तसेच लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष उभारावेत, असे निर्देश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.
फडणवीस यांना काही काम राहिले नाही
देवेंद्र फडणवीस यांना काहीही काम राहिलेले नाही. कोणत्याही छोटय़ा छोटय़ा गोष्टींवर ते वक्तव्य करतात, अशी टीका पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. दरम्यान, शिव स्वराज्यदिनी भगवा ध्वज उभारण्यास विरोध करणारे ऍड. गुणवंत सदावर्ते यांचा मुश्रीफ यांनी निषेध केला व त्यांच्या विरोधामागे भाजप कनेक्शन असल्याचा दावाही त्यांनी केला.



























































