
माझगाव व डोंगरीला जोडणाऱया आणि हजारो प्रवासी-रहिवाशांच्या वाहतुकीसाठी उपयोगी असणाऱया ऐतिहासिक हँकॉक ब्रिजचा दुसरा गर्डर बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. पुलाच्या बांधकामात महत्त्वाचा आणि आव्हानात्मक टप्पा पूर्ण झाल्याने पुलाच्या पुनर्बांधणीला आता वेग येणार आहे.
वाहतुकीसाठी धोकादायक झाल्यामुळे सॅण्डहर्स्ट रोड आणि भायखळामधील 135 वर्षे जुना हा ब्रिटिशकालीन पूल जानेवारी 2016 मध्ये पाडण्यात आला. या पुलाच्या बांधकामात अनेक अडथळे आले, मात्र पालिकेने सर्व अडथळ्यांवर मात करीत पुलाच्या बांधकामाला सुरुवात केली. या पुलाची लांबी 64.62 मीटर, रुंदी 30.08 मीटर असून पुलाचे पृष्ठीकरण डीबीएम आणि मास्टिक अस्फाल्टचे असणार आहे. आरसीसी वॉल टाईप पाईल्स पद्धतीचे या पुलाचे पायाचे बांधकाम असणार आहे. तसेच स्टील गर्डर व आरसीसी डेक स्लॅब प्रकारचे बांधकाम असणार आहे. अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ते-पूल प्रमुख अभियंता राजेंद्रकुमार तळकर आणि त्यांचे सहकारी पुलाच्या पुनर्बांधणीसाठी कार्यवाही करीत आहेत.
कामाला वेग येणार
हँकॉक पुलाच्या बांधणीतील पहिल्या टप्प्यात पहिला गर्डर जुलै 2020 मध्ये बसवण्यात आला. या मार्गावरील पदपथ जानेवारी 2021 मध्ये सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आला. दुसऱया टप्प्यातील सुमारे 675 मेट्रिक टन वजनाचा गर्डर बसवण्याचे काम रविवारी पूर्ण करण्यात आले. पालिका आणि मध्य रेल्वेच्या अधिकाऱयांनी योग्य समन्वय साधून हे काम पूर्ण करण्यात आले. दुसरा गर्डर बसवण्याचे काम पूर्ण झाल्याने पुलाच्या पुनर्बांधणीला आता आणखी वेग येणार आहे.
























































