रेखा जरे प्रकरण – खूनाचे कारण अन् मोबाईल डेटा गुलदस्त्यात! दोषारोपपत्रातून उलगडा होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या होऊन सहा महिने होत आले तरी त्यांच्या खुनाचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. तसेच, या खूनप्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे याचा आयफोन फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आला असला, तरी त्यांच्याकडून येणारा अहवाल अजूनपर्यंत गुलदस्त्यातच आहे. आता दाखल होणाऱया दोषारोपपत्रातून हा उलगडा होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात असून, याबाबत पोलिसांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

रेखा जरे यांचा 30 नोव्हेंबर 2020 रोजी जातेगाव घाटात खून झाला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने पाच आरोपींना पकडले तसेच तीन महिन्यांनंतर मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे व त्याच्या आणखी पाच साथीदारांनाही पकडले. पहिल्या पाच आरोपींविरुद्धचे दोषारोपपत्र पोलिसांनी न्यायालयात सादर केले आहे व नंतर पकडलेल्या बोठेसहित अन्य आरोपींविरुद्धचे पुरवणी दोषारोपपत्र उद्या (दि. 8) न्यायालयात सादर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जरे यांचा खून नेमका कोणत्या कारणाने झाला, याचा उलगडा अजूनही पोलिसांना झालेला नाही.

त्यामुळे रेखा जरे यांचा खून बोठे याने सुपारी देऊन का केला, याचे कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे. मंगळवारी पारनेर न्यायालयात दाखल होणाऱया पुरवणी दोषारोपपत्रातून हे कारण स्पष्ट होईल की नाही, याची उत्सुकता आहे

फॉरेन्सिकचा अहवाल प्रतीक्षेत

जरे यांच्या हत्येनंतर पत्रकार बाळ बोठे फरार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेऊन त्याचा मोबाईल, रिव्हॉल्व्हर जप्त केले होते. त्याचा मोबाईल (आयफोन) जप्त करूनही आता सहा महिने झाले आहे. तो आयफोन फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठवल्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले होते. या घटनेला आता सहा महिने होत असल्याने फॉरेन्सिक लॅबच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.