
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका पुढील वर्षी असल्या तरी भाजपने आतापासूनच राजकीय जुळवाजुळव सुरू केली आहे. काँग्रेस नेते, माजी केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी जितीन प्रसाद यांचे भाजपमध्ये स्वागत केले. यानंतर प्रसाद यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. यावेळी पत्रकार परिषदेत जितीन प्रसाद म्हणाले, आपल्या कुटुंबाचे तीन पिढय़ांपासून काँग्रेसशी नाते होते. काँग्रेस पक्षाचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतला आहे. भाजप हा खऱया अर्थाने राष्ट्रीय पक्ष असल्याचे मला जाणवत होते.
कोण आहेत जितीन प्रसाद?
जितीन प्रसाद हे दिवंगत ज्येष्ठ काँग्रेस नेते जितेंद्र प्रसाद यांचे पुत्र आहेत. जितेंद्र प्रसाद यांनी दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि नरसिंह राव यांच्याबरोबर काम केले होते. ते उत्तर प्रदेशातील 15व्या लोकसभेचे खासदार होते.






















































