सहा पंपिंग स्टेशनमुळे मोठा पूर टळला! सलग आठ तास पाण्याचा उपसा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत मुसळधार पाऊस झाल्याने अनेक भागांत पाणी साचले असले तरी पंपिंग स्टेशनच्या माध्यमातून पाण्याचा निचरा केल्यामुळे मुंबई मोठा पूर येण्यापासून वाचली. सहा पंपिंग स्टेशन सलग सहा तास कार्यरत राहून पाण्याचा निचरा करीत होते. त्यामुळे मुंबईतील रस्ते वाहतूक सुरू ठेवण्यात यश आल्याचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनीही मुसळधार पावसात भेटी देऊन आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

एकीकडे अवघ्या 3 ते 4 तासांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असताना सकाळी 11.45 वाजता समुद्रात 4.16 मीटर उंच लाटांची भरती होती. साहजिकच पावसाचे पाणी वाहून नेणाऱया वाहिन्या तसेच नाल्यांमधील पाणी समुद्रामध्ये जाणे शक्य होत नव्हते. अशा वेळी पाणी साचण्यास सुरुवात होत असतानाच पालिकेने तातडीने आवश्यक त्या ठिकाणचे पंप कार्यान्वित केले. सकाळी 7 ते 8 वाजेदरम्यान संपूर्ण मुंबईत मिळून 45 पंप पाण्याचा निचरा करत होते. तर दुपारी 1 ते 2 दरम्यान जोरदार पावसाच्या प्रसंगी 197 पंप सुरू होते. स्वाभाविकच ठिकठिकाणच्या पाण्याचा वेगाने निचरा करण्यास मदत झाल्याचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले.

…म्हणूनच तुंबते पाणी

मुंबईतील पर्जन्य जलवाहिन्यांमधून प्रतितास 30 मिमी इतक्या वेगाने कोसळणाऱया पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची क्षमता आहे. मात्र त्याच्या दुप्पट म्हणजे प्रतितास 60 मिमी वेगाने पाऊस कोसळू लागल्यास नाले व पर्जन्य वाहिन्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक पाणी वाहून ते साचण्याची समस्या निर्माण होते. अतिवृष्टी सुरू असताना समुद्राला भरती आल्यास सखल भागांमध्ये ही समस्या अधिक जाणवते.

9 ठिकाणी सर्वाधिक पाऊस

मुंबईत बुधवारी दुपारी 3 वाजेपर्यंतच्या 24 तासांच्या कालावधीमध्ये 9 ठिकाणी सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली. यामध्ये चेंबूर अग्निशमन केंद्र परिसर 297 मिमी, विक्रोळी अग्निशमन केंद्र परिसर 274 मिमी, एम/पश्चिम विभाग 269 मिमी, एच/पूर्व विभाग 262 मिमी, रावळी कॅम्प 259 मिमी, एम/पूर्व विभाग 258 मिमी, धारावी परिसर 256 मिमी, सांताक्रुझ परिसर 249 मिमी आणि विलेपार्ले 240 मिमी पावसाची नोंद झाली.