मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांच्या अर्थसहाय्यातून कोरोना रुग्णांसाठी ‘रिक्षा अॅम्ब्युलन्स’ उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑक्सिजनची तीव्र गरज भासणाऱया कोरोनाबाधित रुग्णांना घरापासून जवळच्या रुग्णालयापर्यंत पोचवण्यासाठी ‘रिक्षा अॅम्ब्युलन्स’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम पुण्यात सुरू करण्यात आला आहे. दुबईस्थित ‘अल अदील’ समूहाचे अध्यक्ष तथा ‘मसालाकिंग’ डॉ. धनंजय दातार यांच्या सहकार्यातून पुणेस्थित ‘स्वदेश सेवा फाऊंडेशन’ व ‘बघतोय रिक्षावाला फोरम’ स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमातून ही खास सेवा सुरू करण्यात आली आहे.

रुग्णाचे घर गल्लीबोळात असल्यास अरुंद रस्त्यामुळे रुग्णवाहिका तेथपर्यंत पोहचणे अशक्य होते. यावर उपाय म्हणून ‘रिक्षा अॅम्ब्युलन्स’  सुरू  करण्यात आल्याचे या उपक्रमाच्या समन्वयक ‘स्वदेश सेवा फाऊंडेशन’च्या संस्थापक धनश्री पाटील यांनी सांगितले. ऑक्सिजन सिलिंडर व वैद्यकीय उपकरणांनी सज्ज 25 ऑटोरिक्षा अॅम्ब्युलन्सचा ताफा तत्पर असून त्यांची संख्या लवकरच 100 पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे.

या उपक्रमात तज्ञ डॉक्टरांचा संघही सहभागी आहे. रुग्णाच्या नातलगांनी 96572 89411 या हेल्पलाइनवर संपर्क साधल्यानंतर रुग्णाला घरापासून जवळच्या रुग्णालयात दाखल करेपर्यंत पूर्ण वेळ हे डॉक्टर रिक्षाचालकांना रुग्णाची काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन करण्यात येईल.

ऑक्सिजनअभावी रुग्णांचे झालेले हाल विसरता येणार नाहीत. समाज संपूर्ण साथमुक्त होईपर्यंत आपल्याला काळजी घेणे भाग आहे. या पार्श्वभूमीवर रिक्षा अॅम्ब्युलन्स रुग्णांसाठी नक्कीच प्राणदाता ठरतील ही माझी खात्री आहे.
– डॉ. धनंजय दातार