आज भाजपमध्ये बड्या नावांची भरती, विधानसभा निवडणुकीची आतापासून तयारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
jp-nadda-pc

पुढल्यावर्षी अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. ते लक्षात घेत राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजप यासगळ्यात आघाडीवर असून निवडणुकांच्या दृष्टीनं तयारी सुरू झाली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं पुन्हा एकदा भरती अभियान सुरू केलं आहे. यामध्ये सर्वांचं लक्ष पंजाबच्या निवडणुकांवर लागून राहिलेलं आहे.

पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता असून राज्यात पु्न्हा सत्तेत येण्यासाठी भाजपनं जोर लावला आहे. भाजपमध्ये अनेक नवी नावं जोडली जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. त्यामध्ये वकील, सैन्याशी जोडलेल्या व्यक्ती आणि प्रोफेसर यांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

punjab-election-bjp-name

दरम्यान, उत्तर प्रदेशातही राजकीय हालचालींना सुरुवात झाली असून काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये जितिन प्रसाद यांनी प्रवेश केला आहे. उत्तर प्रदेशातील ब्राह्मण समाजातील नाराजी दूर करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.

पश्चिम बंगालमध्ये भरतीनंतर जागा वाढल्या मात्र सत्ता दूर

पश्चिम बंगालमध्ये भाजपनं प्रचंड ताकद लावली होती आणि मोठ्या प्रमाणावर भरती देखील केली होती. तृणमूलमधील मोठी नावं सहभागी करून घेतली, मात्र असं असून देखील सत्तेपासून भाजप दूर राहिली. त्यांच्या जागांमध्ये वाढ झाल्याचं स्पष्ट दिसून आलं.

2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी आतापासूनच तयारी सुरू झाली आहे. उत्तर प्रदेश आणि पंजाब ही मुख्य राज्ये आहेत. त्याशिवाय उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. तर 2022 च्या शेवटच्या टप्प्यात हिमाचल प्रदेश आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या राज्यातून येतात त्या गुजरातच्या निवडणुका होणार आहेत. तेव्हा 2022 हे वर्ष राजकीय दृष्टीनं महत्त्वाचं वर्ष ठरणार आहे.