
>> विवेक दिगंबर वैद्य
‘सूरसागर’ तलावाचे महत्त्वपूर्ण ‘स्थान’माहात्म्य म्हणजे ब्रह्मनिष्ठ वामनबुवा यांनी जलसमाधी घेण्याकरिता जेव्हा उडी घेण्याचे ठरविले तेव्हा श्रीस्वामी समर्थ प्रकट झाले आणि श्रीस्वामींचे दिव्य चरण ज्या ठिकाणी उमटले तिथे बडोद्यातील श्रीस्वामीभक्तांनी अतिशय अप्रतिम मंदिर उभारले. या श्रीस्वामी मंदिरामध्ये श्रीस्वामी समर्थांच्या पादुका स्थापन करण्यात आल्या.
महाराष्ट्रातील नगर येथे राहणाऱ्य़ा व धारण्य गोत्राच्या यजुर्वेदी ब्राह्मण कुटुंबात पिढीजात ‘वैद्यकी’ सांभाळणाऱ्य़ा मोरेश्वरराव यांनी ‘वैद्यामृत’ या प्रसिद्ध ग्रंथाद्वारे अपार ख्याती मिळवली. याच वंशातील नारायणराव यांनी दुर्मिळ, नैसर्गिक औषधींच्या अध्ययनावर जहागिरी प्राप्त केली तर ब्रह्मज्ञानी त्र्यंबकराव, विठ्ठलराव व त्यांचे चिरंजीव रावजी या कर्तृत्ववान मंडळींनी ‘वैद्य’ घराण्याची ख्याती अधिक वृद्धिंगत केली. प्रपंच व परमार्थ यांची यथायोग्य सांगड घालणारे रावजी, पत्नी अहिल्येसह तीर्थयात्रेच्या निमित्ताने सर्वत्र प्रवास करीत असत.
एकदा रावजी सहकुटुंब द्वारकायात्रेस गेले तेव्हा तिथे त्यांनी, श्रीनृसिंहस्वामींचे प्रत्यक्ष दर्शन घडून स्वात्मप्रतिती लाभलेल्या भुर्याबुवा या सत्पुरुषाचे दर्शन घेतले. योगायोगाने, त्याच वेळी श्रीनृसिंहस्वामींचे दर्शन घेण्याची तळमळ लागून राहिलेल्या अन्य एका अंध भक्तासाठी तिथे साक्षात श्रीनृसिंहस्वामी अवतरले आणि त्यांच्या कृपेने अंध भक्तास दृष्टी प्राप्त झाल्याची लीला तिथे घडली. याच वेळी, श्रीनृसिंहस्वामींनी रावजी वैद्य यांच्याकडे पाहिले आणि त्यांना, ‘यापूर्वी दोन वेळा आपली भेट झाली’ असल्याचे सांगितले. रावजींना त्या भेटींचे संदर्भ लक्षात येताच श्रीस्वामींचरणी साष्टांग दंडवत घालून आशीर्वाद देण्याची विनंती केली. तेव्हा त्यांच्या मस्तकावर हात ठेवून श्रीस्वामी म्हणाले, ‘आपल्या वंशास सर्व सौख्य लाभेल. शिवशक्तीचा आपणांवरील कृपाप्रसाद वृद्धिंगत होईल. आपणांस तीन पुत्र लाभतील व त्यातील तिसरा पुत्र आमच्या लीलाचमत्कारांचे वर्णन ग्रंथबद्ध करेल.’ हे श्रीनृसिंहस्वामी म्हणजेच श्रीअक्कलकोट येथे अवतरलेले श्रीस्वामी समर्थ महाराज.
श्रीस्वामी समर्थांचे आशीर्वचन काही दिवसांतच सत्यात उतरले. रावजी आणि अहिल्या यांच्या पोटी, वेणीमाधव, विश्वनाथ आणि वामन या नावाने पुढे ख्यातकीर्त झालेले तीन सुपुत्र जन्मले. यातील, दि. 16-8-1848 रोजी बुधवारी जन्मलेला तिसरा पुत्र वामन म्हणजेच ब्रह्मनिष्ठ वामन रावजी वैद्य. श्रीस्वामी समर्थांच्या अवतारकार्यातील लीलाप्रसंगांचे वर्णन ‘श्रीगुरुलीलामृत’ ग्रंथलेखनाद्वारे करणारा हा सत्पुरुष.
वामोरी येथे वास्तव्यास असलेल्या वामनबुवांनी मराठी ‘सहावी’पर्यंत शिकून तेथेच मदतनीस शिक्षकाची नोकरी केली. नित्यकर्मासोबतच त्यांचे वडीलबंधूंच्या मार्गदर्शनानुसार वेदाध्ययन सुरू होते. सत्संगाची आवड असल्याने साधुसंत, साई-फकीर, यती-जंगम, योगीसंन्यासी, महंत-वेदांती अशा अनेकांशी वामनबुवांचा परिचय झाला. सर्वकाही यथायोग्य होते तरीदेखील चित्त स्थिर होत नव्हते. पुढे, वडील रावजी निवर्तल्यावर बुवांनी इंग्रजी ‘पाचवी’पर्यंतचे शिक्षण घेतले, धुळ्यास कलेक्टर कचेरीत नोकरी केली. मात्र प्रकृतीत बिघाड झाल्याने ते पुन्हा वामोरीस परतले. येथे त्यांनी अहमदनगरच्या वृत्तवैभव छापखान्यासाठी लेखन केले. याच दरम्यान त्यांना अक्कलकोटच्या श्रीस्वामी महाराजांविषयी समजले आणि काही काळाने वामनबुवा पुणे मुक्कामी असताना ‘गुरु दत्तात्रेयस्वरूप स्वामी अक्कलकोटास दर्शन देतील’ असा स्वप्नदृष्टांत घडल्यामुळे बुवा लगेच अक्कलकोटी निघाले. त्यांना श्रीस्वामी समर्थांचे दर्शन घडले. पयोनदीच्या तीरावर श्रीस्वामींनी महामंत्राचा उपदेश करून, नामसाधना ध्यानादीविधीसह सांगून बुवांच्या अंगावर अवधूतगीता फेकली आणि म्हणाले, ‘आमची नोकरी कर. ब्रह्मनिष्ठ होशील.’
पुढे काही दिवस श्रीस्वामीसंनिध वास्तव्य केलेल्या वामनबुवांना ‘गाणगापुरास जाऊन गुरुचरित्राचा सप्ताह करावा’ अशी श्रीस्वामीआज्ञा झाली. तोवर वामनबुवांची चित्तवृत्ती स्थिर झाली होती. मनाची तळमळ निमाली. तरीही पुढे काही काळानंतर त्यांच्या शारीरिक दुखण्याने उचल खाल्ली आणि दुर्दैवाने सन 1876 पासून वामनबुवांची प्रकृती एकाएकी बिघडली. मूत्रकृच्छ, खोकला, आमांश, संधिवात, नेत्ररोग, शरीरदाह, मूळव्याध असे विविध रोग उद्भवले. लौकिक उपाय, उपचार झाले, परंतु रोग शमेना. पराकोटीच्या शारीरिक दुःखामुळे बडोदा मुक्कामी असलेले वामनबुवा अधिक बेचैन झाले. प्राणायाम करून जलसमाधी घेण्याचे ठरवून मध्यरात्री, वामनबुवांनी निश्चयपूर्वक सूरसागर तलावात उडी टाकली. तोच, दयाघन श्रीस्वामी समर्थ तिथे प्रत्यक्ष प्रकट झाले. वामनबुवांचा हात धरून त्यांना वर काढले आणि बुवांच्या श्रीमुखात भडकावून ते म्हणाले, ‘शहाण्या गाढवा! आयुष्य असून का मरतोस? देहप्रारब्ध कर्मक्षय होईपर्यंत तुला प्रारब्ध भोगलेच पाहिजे! सहजसमाधी सोडून जलसमाधी कसली घेतोस? हेच ब्रह्मज्ञान तुला कळले काय? दुःखाने कां कुणी प्राणत्याग करते?’ असे रागावून व त्यानंतर प्रेमाने समजूत घालून, श्रीस्वामींनी वामनबुवांना सुखरूप घरी पोहोचवले. श्रीस्वामींचा हस्तस्पर्श होताच वामनबुवांचा आजार पुरता बरा झाला. आधीव्याधी नाहीशा झाल्या आणि प्रकृतीस आराम पडून काही दिवसातच वामनबुवा खडखडीत बरे झाले.
आता, जिथे वामनबुवांनी पाण्यात उडी घालून आपले आयुष्य संपविण्याचे ठरविले त्या सूरसागर तलावाविषयी जाणून घेऊ. हा तलाव बडोदा शहराचे मुख्य आकर्षण म्हणून पूर्वापार परिचित आहे. बडोदा संस्थानच्या कलासक्त गायकवाड घराण्याने भव्य इमारती, मंदिरे, वास्तू, मांडवी गेट, गेंडीगेट अशी कमानीयुक्त भव्य प्रवेशद्वारे, विस्तीर्ण बागा, शाळा-महाविद्यालये निर्माण केली. याच अनुषंगाने शहराच्या सौंदर्यात भर घालणारा हा ‘सूरसागर’ तलाव सध्या ‘शिवसागर’ या नावानेही ओळखला जातो. कारण तलावाच्या मध्यभागी उभारलेली तसेच चोहोबाजूंनी दिसणारी उभ्या आणि भव्य स्वरूपातील श्रीशिवशंकराची विलक्षण देखणी मूर्ती आपले लक्ष वेधून घेते.
‘सूरसागर’ तलावाचे महत्त्वपूर्ण ‘स्थान’माहात्म्य म्हणजे ब्रह्मनिष्ठ वामनबुवा यांनी जलसमाधी घेण्याकरिता जेव्हा उडी घेण्याचे ठरविले तेव्हा श्रीस्वामी समर्थ प्रकट झाले आणि श्रीस्वामींचे दिव्य चरण ज्या ठिकाणी उमटले तिथे बडोद्यातील श्रीस्वामीभक्तांनी अतिशय अप्रतिम मंदिर उभारले. या श्रीस्वामी मंदिरामध्ये श्रीस्वामी समर्थांच्या पादुका स्थापन करण्यात आल्या. या स्थानाचे आणखी एक माहात्म्य म्हणजे या श्रीस्वामी मंदिराचा भक्तार्पण सोहळा थोर सत्पुरुष श्रीरंगावधूत महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न झालेला आहे.





























































