WTC Final चौथ्या दिवशीही पावसाची बॅटिंग, सामन्याचा निकाल लागणे जवळपास अशक्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि न्यूझीलंड संघात सुरू असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीत पावसाचा खेळ सुरूच आहे. आज चौथ्या दिवशी तिन्ही सत्र पावसामुळे वाया गेली. त्यामुळे क्रीडा रसिक निराश झाले. उद्याही पावसाची शक्यता असल्याने सामन्याचा निकाल लागणे अशक्य वाटत आहे.

हवामान विभागाने आज 98 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला होता आणि तो खरा ठरला आहे. तसेच उद्या पाचव्या दिवशी देखील हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे. याआधी पहिला दिवस पाण्यात गेल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाचा बराचसा खेळ खराब प्रकाशामुळे वाया गेला होता. गेल्या 3 दिवसात फक्त 141.1 षटकाचा खेळ झाला आहे.

दरम्यान, टीम इंडियाचा पहिला डाव 217 धावांमध्ये गुंडाळला गेला. अजिंक्य रहाणे याने सर्वाधिक 49 तर विराट कोहली याने 44 धावांचे योगदान दिले. टीम इंडियाकडून एकही फलंदाज 50 चा आकडा पार करू शकला नाही. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज कायले जेमिसन याने 31 धावा देऊन 5 बळी मिळवले.

यानंतर न्यूझीलंडला लेथम आणि कॉन्व्हे यांनी चांगली सलामी दिली. दोघात पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी झाली. फिरकीपटू आर. अश्विनने लेथमला 30 धावांवर बाद करत टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर इशांत शर्मा याने कॉन्व्हे याला 54 धावांवर बाद करत न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा न्यूझीलंडच्या 2 बाद 102 धावा झाल्या होत्या. न्यूझीलंडचा संघ अद्यापही 116 धवांनी पिछाडीवर आहे.

निकाल लागणे जवळपास अशक्य

दरम्यान, चौथा दिवसही पावसामुळे वाया गेल्याने आणि पाचव्या दिवशी देखील पावसाचा अंदाज असल्याने 2 दिवसात सामन्याचा निकाल लागणे अशक्य वाटत आहे. असे झाल्यास सामना रद्द होईल आणि हिंदुस्थान आणि न्यूझीलंड संघाला संयुक्त विजेता घोषित करण्यात येईल. विजयाची रक्कम दोन्ही संघाला विभागून दिली जाईल.