
ठाणे- व्हॉट्सअॅपवर तरुणींचे फोटो पाठवून त्यांच्याकडून शरीरविक्रयचा व्यवसाय करून घेणाऱ्या पप्पूकुमार यादव (26) या दलालास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने अटक केली. या दलालाने व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून सेक्स रॅकेटचा गोरखधंदा थाटला होता. त्याच्या तावडीतून दोन पीडित तरुणींची सुटकाही करण्यात आली आहे.
ठाण्यातील कासारवडवली येथील आनंदनगर बस डेपोजवळ एक व्यक्ती दोन तरुणींना शरीरविक्रयसाठी घेऊन येणार असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या कक्षाला मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील चव्हाणके, भगवान औटी, सहायक पोलीस निरीक्षक शीतल मदने यांच्या पथकाने एका बनावट गिहाईकाच्या मदतीने घटनास्थळी धाड टाकली. त्यावेळी तिथे दलाल पप्पूकुमार यादव याने आणलेल्या दोन तरुणींची या पथकाने सुटका केली. त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले असून यादव याला 28 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी दिली.
ग्लोबल रुग्णालयात मोबाईल चोरट्यांचा उपद्रव
कोरोनाच्या उपचारासाठी एक हजार बेड्चे रुग्णालय असलेल्या साकेत येथील ग्लोबल रुग्णालयात अज्ञात मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. या रुग्णालयातून दोन मोबाईल चोरी झाल्याच्या तक्रारी कापूरबावडी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या असून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ग्लोबल रुग्णालयात रुग्णांचे मोबाईल चोरीच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या रुग्णालयात बाहेरील कुठलाही व्यक्ती प्रवेश करीत नसताना अशा प्रकारच्या चोरी कोण करतेय याचा तपास पोलीस करीत आहेत.



























































