
कोरोनामुळे दोन वेळचे जेवण मिळणे मुश्कील झालेल्या पाच हजार गरजूंची दोन वेळची भूक पालिका भागवत आहे. यामध्ये दुपारी 5645 तर सायंकाळी 5065 अशी दिवसाला एकूण 10710 अन्नाची पाकिटे वाटली जात आहेत. सर्व 24 प्रभागांत ‘बेस्ट’ बसेसच्या सहाय्याने या जेवणाचे वितरण केले जात आहे.
मुंबईत गेल्या वर्षी 11 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. यानंतर काही दिवसांतच वेगाने रुग्णवाढ झाल्याने मार्चअखेर संपूर्ण कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. यामुळे रोजंदरी, स्थलांतरित कामगारांसह हजारो गोरगरीब-गरजूंना दोन वेळचे जेवण मिळणेही मुश्कील झाले. मात्र याच वेळी पालिकेने गोरगरीब, स्थलांतरित कामगार आणि गरजूंसाठी पुलाव, खिचडी आदी प्रकारचे दोन वेळचे जेवण देण्यास सुरुवात केली. यासाठी अनेक सामाजिक संस्थाही पालिकेच्या सहाय्यासाठी धावून आल्या. कोरोनाच्या दुसऱया लाटेतही निर्बंध कठोर करण्यात आल्यामुळे पालिकेच्या माध्यमातून 14 एप्रिलपासून पुन्हा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नियोजन विभागाच्या सहायक आयुक्त संगीता हसनाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती प्रमुख समाज विकास अधिकारी (नियोजन) भास्कर जाधव यांनी दिली.
असे होतेय वितरण
कोरोनाच्या दुसऱया लाटेतील या उपक्रमात बेघर, भिक्षेकरी, अपंग, वृद्ध व बालक यांना दोन वेळचे जेवण दिले जात आहे. ‘बेस्ट’ बसेसच्या माध्यमातून पालिकेच्या 24 प्रभागांतील समाज विकास अधिकारी (नियोजन) समुदाय संघटक, कर निर्धारण व संकलन खात्यामधील एक निरीक्षक, कामगार यांच्या माध्यमातून गरजू-बेघरांपर्यंत पोहोचून अन्न पाकिटांचे वितरण केले जात आहे. या उपक्रमासाठी 24 बेस्ट बसेस सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेसाठी घेण्यात आल्या आहेत. ‘नेस वाडिया, रामचंद्र मिशन’च्या सहयोगाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
पहिल्या लाटेत 3 कोटी 75 लाख गरजूंना लाभ
गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून पालिकेच्या माध्यमातून दररोज साडेसात लाख गरजूंना जेवण देण्यात येत होते. पहिल्या लाटेत 3 कोटी 75 लाख जणांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे. काही गरजूंना ‘रेशन कीट’ही देण्यात आले.
मुंबईत तौकते चक्रीवादळाच्या प्रसंगी पालिकेकडून बेघर-गरजूंना दोन वेळचे जेवण, बिस्कीटे, ठेपला, पाणी पुरवण्यात आले. ‘खाना चाहिये’ संस्थेच्या सहयोगाने हा उपक्रम राबवण्यात आला. निर्बंध काळात 1333 बेघर महिलांना 20 हजार सॅनिटरी पॅडचे वाटपही करण्यात आले.































































