‘नगर अर्बन’च्या कर्जघोटाळ्यात तीन नामवंत डॉक्टरांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर अर्बन बँकेच्या पिंपरी-चिंचवड शाखेमध्ये 22 कोटी रुपयांच्या कर्जप्रकरणातील फसवणूक व अपहारप्रकरणी पोलिसांनी शहरातील तीन नामवंत डॉक्टरांना अटक केली असून, त्यांना न्यायालयाने 30 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. डॉ. विनोद श्रीखंडे, डॉ. रवींद्र कवडे, डॉ. भास्कर सिनारे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अनेक घोटाळे उजेडात आले आहेत. त्यापैकीच पिंपरी-चिंचवड शाखेतील एक घोटाळा उजेडात आला होता. बँकेच्या पिंपरी-चिंचवड शाखेत 22 कोटी रुपयांच्या कर्जप्रकरणात फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर तपासामध्ये निष्पन्न झाले होते. चिंचवड पोलिसांनी प्रमुख व्यवस्थापक महादेव साळवे यांच्या फिर्यादीवरून 25 जानेवारीला कर्जदार बबन चव्हाण, वंदना चव्हाण, यज्ञेश चव्हाण, मंजुदेवी हरिमोहन प्रसाद, रामचंद्र तांबिले (सर्व रा. चिंचवड), अभिजित नाथा घुले (रा. बुरुडगाव रोड, नगर) यांच्यासह बँकेच्या कर्ज उपसमितीमधील सदस्य व नगर अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे.

पुण्याच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने या संदर्भात आठजणांना अटक केलेली आहे. या प्रकरणामध्ये काहींना अटकपूर्व जामीन मिळालेले आहेत, तर काहींना जामीन मंजूर झालेला आहे. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर नगर येथील आशुतोष लांडगे याच्या नावावर कर्जाच्या रकमेतून 11 कोटी रुपये वर्ग झाल्याचे समोर आले होते. लांडगे याला अटक केल्यानंतर त्याने अनेक विषयांचा उलगडा केला होता. त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी तपास सुरू केला होता. हे 11 कोटी रुपये कुणाला दिले व त्याचा वापर कशा पद्धतीने करण्यात आला होता, याचा तपास करताना यात नगरमधील तीन डॉक्टरांचा समावेश असल्याचे उघड झाले होते. या डॉक्टरांकडे सव्वा सहा कोटी रुपये वर्ग झाल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

त्यामुळे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुण्याच्या पथकाने नगर येथे येऊन या तीन डॉक्टरांना ताब्यात घेतले होते व त्यांना रात्री अटक केली. त्यांना आज पुणे येथे न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी 22 कोटींच्या फसवणूक प्रकरणामध्ये यांचा समावेश असल्याचे उघड झाले असून, त्यांच्या खात्याची तसेच बँकेचे स्टेटमेंट घ्यावयाचे आहे. या घटनेचा तपास करायचा आहे. या तीन डॉक्टरांच्या खात्यामध्ये पैसे कुणी आणि कसे टाकले, त्यांनी या पैशांचे काय केले, याचा तपास पोलिसांना करायचा आहे. त्यामुळे त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकार पक्षातर्फे करण्यात आली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून तिन्ही डॉक्टरांना बुधवार (दि. 30)पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

अर्बन बँकेच्या 22 कोटी रुपयांचा घोटाळा प्रकरणातील गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने आत्तापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे. या तीन डॉक्टरांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून आता पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
– वसंत बाबर, पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, पुणे.