
जम्मू विमानतळावरील हवाई दलाच्या तळावर शनिवारी मध्यरात्री दहशतवादी हल्ला झाला. हल्लेखोरांनी ड्रोनच्या सहाय्याने पाच मिनिटांच्या अंतराने दोन स्फोट घडवले. हल्ल्यात हवाई दलाचे दोन जवान जखमी झाले. विमानतळावर उभी असलेली विमाने आणि हेलिकॉप्टर्स उडवून देण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा दाट संशय आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि हवाई दलाच्या उच्चस्तरीय पथकाने या हल्ल्याचा कसून तपास सुरू केला आहे.
शनिवारी मध्यरात्री 1 वाजून 37 मिनिटांनी पहिला स्फोट हवाई दलाच्या तळावरील तांत्रिक विभागातील इमारतीच्या छतावर झाला तर दुसरा स्फोट 1 वाजून 42 मिनिटांनी मोकळ्या जागेत घडवण्यात आला. स्फोटात इमारतीच्या छताचा काही भाग कोसळला आहे. हवाई दलाचा तळ पाकिस्तानच्या सीमेपासून अवघ्या 14 किलोमीटरवर आहे. देशात पहिल्यांदा ड्रोनच्या सहाय्याने लष्कराच्या तळावर दहशतवादी हल्ला झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. हल्लेखोरांनी पॅलोड आणि ड्रोनचा वापर करून स्फोट घडवून आणल्याचा संशय आहे. जम्मू-कश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे सांगितले. हल्ल्याचे वृत्त समजताच एनआयएसह एनएसजी, जम्मू-कश्मीर पोलीस, हवाई दल, नॅशनल बॉम्ब डाटा सेंटर, फॉरेन्सिक टीम आदी तपास पथकांनी घटनास्थळी धाव घेऊन अधिक तपास सुरू केला आहे. तसेच हवाई दलाच्या तळाचा संपूर्ण परिसर सील करून सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हल्ल्याची गंभीर दखल घेतली असून व्हाईस चीफ एअर मार्शल एच. एच. अरोरा यांच्याकडून हल्ल्याची माहिती घेतली. त्याचबरोबर एअर मार्शल विक्रम सिंह यांनी जम्मूत पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला.
पाकिस्तानी दहशतवादी संघटनांनी गेल्या वर्षी चीनकडून ड्रोन्सची खरेदी केली होती. ते ड्रोन्स 20 किलोपर्यंतचे पॅलोड उचलण्यास तसेच 25 किलोमीटरपर्यंत उड्डाण करण्यास सक्षम होते. तसेच या ड्रोन्सच्या सहाय्याने एखादे टार्गेट निश्चित करून आयईडी स्फोटके पाडली जाऊ शकतात. त्यामुळे जम्मूतील हवाई दलाच्या तळावरील दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचाच हात असण्याची दाट शक्यता आहे.
श्रीनगरमध्ये पोलिसांवर ग्रेनेडहल्ला
श्रीनगरच्या बर्बर शाह परिसरात पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर दहशतवाद्यांनी ग्रेनेडहल्ला केला. हल्ल्यात महिलेसह चार नागरिक जखमी झाले, तर एकाचा मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ग्रेनेड जवानांपर्यंत न पोहोचता रस्त्यावर फुटला, असे पोलिसांनी सांगितले.
गर्दीच्या ठिकाणीही हल्ल्याचा कट होता!
एकीकडे विमानतळ स्फोटांनी हादरले असतानाच दुसरीकडे गर्दीच्या ठिकाणी मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा कट जम्मू-कश्मीर पोलिसांनी उधळून लावला. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील त्रिकुटा परिसरातील वेब मॉलजवळून 20 वर्षांच्या नदीम नावाच्या दहशतवाद्याला अटक करण्यात आली. तो बनिहाल येथे राहणारा असून त्याच्याकडून 5 ते 6 किलो आयईडी स्फोटके जप्त करण्यात आली. नदीम हा लष्कर-ए-तोएबाचा दहशतवादी असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेतला जात आहे.

























































