
एका दोन वर्षाच्या मुलाच्या श्वासनलिकेत खिळा अडकला होता. डॉक्टरांनी जटिल शस्त्रक्रिया करून हा खिळा काढला आणि या बालकाचे प्राण वाचवले आहेत.
पश्चिम बंगालमधील दिनाजपूर जिल्ह्यातील ही घटना आहे. मुस्तकिन अली (2) हा मुलगा त्याच्या आईवडिलांसोबत राहात होता. एक दिवस त्याचे आजोबा बांबू कापून घराबाहेर लावून ठेवण्याचे काम करत होते. ते काम करत असताना त्यांच्या जवळच मुस्तकिन खेळत होता. काम करत असताना त्यांचे लक्ष जेव्हा त्याच्याकडे गेले तेव्हा मुस्तकिन खोकत असल्याचे आणि त्याच्या तोंडून रक्त येत असल्याचे त्यांनी पाहिले. ते धावतच त्याच्या जवळ गेले. त्यांनी घरातील इतर सदस्यांनाही याबाबत सांगितले. त्याच्या आईला जेव्हा हे कळले तेव्हा ती घाबरूनच गेली.
ती लहानग्या मुस्तकिनला घेऊन रायगंड वैद्यकीय महाविद्यालयात गेली. मुस्तकिनला श्वास घ्यायला त्रास होत होता तसेच त्याला उलट्याही होत होत्या. रायगंड वैद्यकीय महाविद्यालयातून त्याला मालदा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले त्यानंतर त्याला कलकत्त्यातील एसएसकेएम या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया करून त्याच्या श्वासनलिकेत अडकलेला लोखंडाचा खिळा यशस्वीरित्या बाहेर काढला.
रविवारी सकाळी 7 वाजता शस्त्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. बराच वेळ ही शस्त्रक्रिया सुरू होती. डॉ. अरुणव सेनगुप्ता यांच्या नेतृत्वाखाली 4 डॉक्टरांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. ‘मुस्तकिनच्या श्वासनलिकेत खिळा अडकल्यामुळे त्याला श्वास घ्यायला त्रास होत असून उलट्याही होत होत्या. आता त्याला पेडियाट्रिक आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली.


























































