
लहानपणी आपण टारझन आणि मोगलीची गोष्टी ऐकल्या असतील, पाहिल्याही असतील. टारझन किंवा मोगली हे जन्मापासूनच जंगलात असता, त्यांचा सांभाळ प्राणीपक्षी करतात वैगरे वैगरे या गोष्टींमध्ये सांगण्यात येतं. जंगलात वाढल्याने त्यांना बाहेरच्या जगाबद्दल काही माहिती नसतं असंही या गोष्टीत सांगण्यात येतं. या दोघांसारखी कथा प्रत्यक्षात जगलेला एक माणूस सापडला आहे. या माणसाचं वय 41 वर्षे असून तो व्हिएतनाममध्ये आढळला आहे. जंगलापलिकडेही जग असतं हे त्याला जन्मापासून आजपर्यंत माहितीच नव्हतं. इतकंच काय या जगात महिला आहेत हे देखील त्याला माहिती नव्हतं. जंगलात राहिल्याने आणि महिलांबद्दल माहितीच नसल्याने या माणसाच्या शारीरिक इच्छाही मेल्याचं सांगण्यात येत आहे.
व्हिएतनामध्ये 1972 साली अमेरिकेने युद्ध छेडले होते. तेव्हा ‘हो वेन लँग’ हा व्हिएतनामच्या जंगलात पळून गेला होता. या युद्धात त्याच्या आईचा आणि बहिणीचा मृत्यू झाला होता. लँग आपल्या भावासोबत आणि वडिलांसोबत जंगलात राहत होता. लँग जंगलात पळून आला तेव्हा तो अंदाजे 8 वर्षांचा होता. जंगलातील मध गोळा करून, फळं खाऊन आणि वेळ पडेल तेव्हा जंगली प्राण्यांची शिकार करून हे तिघे दिवस काढत होते. या तिघांनी मिळून जंगलात घरही बांधलं होतं.
2015 साली अल्वारे सेरोजे हा फोटोग्राफर व्हिएतनामच्या जंगलात फिरत होता. ‘लँग’ याला सेरोज जंगलात फिरताना दिसला होता. सेरोज दिसताच लँगने तिथून धूम ठोकली होती. सेरोजने लँगला पळताना पाहिले होते. त्याने महत्प्रयासाने त्याला शोधून काढले होते. सेरोजने लँगला शोधून जवळच्या गावात आणले. गावात आणल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली तेव्हा सेरोज आणि गावकऱ्यांना ‘लँग’कडून धक्कादायक गोष्टी कळाल्या. आपल्याला वडिलांनी महिलांबद्दल काही सांगितलेच नाही, त्यामुळे जगात महिला आहेत हेच मला माहिती नसल्याचं लँगने सांगितलंय.
आजही लँगला पुरुष आणि महिलांमधील फरक कळत नाही. तसेच त्याला कुठलीही लैंगिक इच्छा किंवा जाणीव होत नाही असे सेरोजेन सांगितले. लँग लहानपणापासून जंगलात राहिला आणि वाढला. त्याचे मन एका लहान मुलासारखे असून त्याला चांगले आणि वाईट गोष्टींबद्दल काहीच कळत नाही असंही सेरोजनं म्हटलंय.


























































