दुसऱ्या लाटेतच कोरोनाचा लहान मुलांमध्ये संसर्ग, जून महिन्यात 1176 मुलांना कोरोनाची लागण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याचे तज्ञांचे मत आहे. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात दुसऱ्या लाटेतच अनेक लहान मुले बाधित झाल्याचे समोर आले आहे. जून महिन्यात जिल्ह्यातील 1176 लहान मुले कोरोनामुळे बाधित झाली आहेत. एप्रिलपासून लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग आढळून आला असून तीन महिन्यात जिल्ह्यात तीन हजारहून अधिक लहान मुले कोरोनाबाधित झालेली आहेत.

जून महिन्यात तब्बल 1176 बालके कोरोनाबाधित सापडली आहेत. बाधित होणाऱ्या लहान मुलांमध्ये 14 वर्षाखालील मुलांची संख्या अधिक आहे. बाधित झालेली काही मुले कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत, तर काही मुले गृह विलगीकरणात आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात बालके बाधित होण्याचं प्रमाण 6.44 टक्के एवढं आहे. रत्नागिरीत दर दिवशी 400 ते 500 कोरोना रुग्ण आढळत आहे. सद्यस्थितीत 6102 ॲक्टिव्ह रुग्ण असून पॉझिटिव्हीटी रेट हा 7.87 टक्के आहे. तर मृत्यूदर हा 2.86 टक्के असून रिकव्हरी रेट हा 87.97 टक्के आहे.

”सध्या दररोज कोरोनाबाधित रूग्णांमध्ये लहान मुले सापडत आहेत.त्यातील काही मुले ही काँटॅक्ट ट्रेसिंग मध्ये सापडली आहेत तर काही मुलांना ताप होता त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या रत्नागिरी जिल्हा रूग्णालय,स्वस्तिक रूग्णालय आणि छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथील कोविड बालरूग्णालयात प्रत्येकी एक बालरोगतज्ञ कार्यरत आहे.” – डॉ.संघमित्रा फुले, जिल्हा शल्यचिकित्सक रत्नागिरी