
नेत्रावती , मस्त्यगंधा एक्स्प्रेस या कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या महत्वाच्या गाड्या आहेत. या गाड्या संगमेश्वर स्थानकात थांबत नसून त्यांना या स्थानकावर थांबा देण्यात यावा अशी आग्रही मागणी संगमेश्वरातील रेल्वे प्रवाशांनी केली आहे. संगमेश्वर स्थानकात या गाड्यांना थांबा दिल्यास मुंबई-ठाण्याला संगमेश्वरातून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल असं प्रवासी संघटनेचं म्हणण आहे. या दोन गाड्यांना संगमेश्वरात थांबा द्यावा या मागणीसाठी प्रवासी संघटनेच्या संदेश जिमन यांनी कोकण रेल्वेला निवेदनही दिले आहे. जर या गाड्यांना संगमेश्वरात थांबा मिळाला नाही तर 15 ऑगस्ट रोजी उपोषण करू असा इशारा जिमन यांनी दिला आहे.
संगमेश्वर स्थानकात या गाड्यांना थांबा देण्यात यावा ही मागणी गेली काही वर्षे सातत्याने करण्यात येत आहे. या मागणीसाठीचा पत्रव्यवहार आणि पाठपुरावाही करण्यात आला आहे. स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात, इथल्या सर्वसामान्यांचा रेल्वे प्रवास सुखकर व्हावा इतकी माफक अपेक्षा संगमेश्वर शहर आणि आसपासच्या रहिवाशांची आहे. राष्ट्रीय महामार्ग 66 ची दूरवस्था असल्याने रस्त्याने प्रवास मरणप्राय यातना देणारा ठरतो आहे. कोरोना काळात अनेकांनी नोकऱ्या गमावल्याने त्यांच्याकडे उत्पन्नाचे साधन नाही. खासगी बसेसने प्रवास करणं खर्चिक असल्याने रेल्वेचा प्रवास हा स्वस्त आणि सुरक्षित आहे. एखाद्या आजारी माणसाला मुंबईला न्यायचे असेल तर आम्हाला रेल्वेचाच आधार आहे असं प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय.

























































