मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रम, उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनावर मात करण्यासाठी औषधांसह प्रशिक्षण वैद्यकीय कर्मचाऱयांचीही अत्यंत आवश्यकता असते. त्यामुळे कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकलसारख्या क्षेत्रातील विविध 36 अभ्यासक्रमांमधून येत्या तीन महिन्यांत 20 हजार प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करून देण्याची महत्त्वाकांक्षी योजना राज्य सरकारने मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून आखली आहे.

युवकांना रोजगार देणाऱया या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

ऑन जॉब ट्रेनिंग प्रशिक्षण

राज्यातील 348 इतकी वैद्यकीय महाविद्यालये, शासकीय रुग्णालये तसेच उत्कृष्ट खासगी रुग्णालयांची प्रशिक्षण केंद्र म्हणून नोंद केली आहे. या माध्यमातून ऑन जॉब ट्रेनिंग पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याकरिता सर्व जिह्यांमध्ये एकूण 500 प्रशिक्षण केंद्रे कार्यान्वित करण्यात येतील. या केंद्रांमधून 20 हजार उमेदवारांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे.

कौशल्य विकासमंत्री मलिक म्हणाले की, आपण ही योजना जाहीर केल्यानंतर केंद्रानेही अशी योजना सुरू केली. उद्योगमंत्री देसाई म्हणाले की, आरोग्य क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची उणीव भरून काढण्यासाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरेल. सार्वजनिक आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, 2020मध्ये कोरोनामुळे बेरोजगारीचा निर्देशांक वाढला होता पण या कार्यक्रमांमुळे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. या क्षेत्राला भरीव मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे.

– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

युवक- युवतींना रोजगार

नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे आरोग्य विभागाला सर्वाधिक निधी उपलब्ध करून दिला आहे. कोरोना संकटकाळात आपण आरोग्यक्षेत्रासाठी सोयीसुविधांची मोठय़ा प्रमाणात उभारणी केली आहे. पण या सोयीसुविधा चालवणारे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध नसेल तर त्याचा उपयोग होत नाही. या उपक्रमातून हे मनुष्यबळ निर्माण होईल व राज्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधीही उपलब्ध होईल. राज्यात ही योजना प्रभावीपणे राबविली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.