नगरचा पारा 35 अंशावर; उकाडय़ाने घालमेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात दमटपणा निर्माण झाला आहे. त्यामुळे उकाडा वाढला असून, हा उकाडा असह्य ठरत आहे. गेले दोन दिवस नगरचे तापमान 35 अंशांवर पोहोचले आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने कमालीचा उकाडा वाढला आहे. भर पावसाळ्यातही उन्हाळी वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे. वातावरणातील हा उकाडा साथीच्या आजारांत भर घालत असल्याचे दिसून येत आहे. दिवसभर आणि रात्रीही वातावरणात उकाडा वाढला आहे. या उकाडय़ाने नागरिकांची घालमेल होत आहे. त्यामुळे नागरिकांना फॅन, कुलरचा आधार घ्यावा लागत आहे. त्यातच महावितरणचा खेळखंडोबा सुरू असून, वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे.

गेले दोन दिवस नगर जिल्ह्याचे कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचले आहे. तर किमान तापमानाची नोंद 26 अंश सेल्सिअस इतकी झाली आहे. वातावरणातील आर्द्रता 70 टक्के आहे. दोन-चार दिवसांत पावसाची शक्यता असल्याने वातावरणात उकाडा वाढला असल्याचे राहुरी विद्यापीठाच्या हवामानतज्ञांनी सांगितले.

आणखी उकाडा वाढणार

चार-पाच दिवसांत पावसाची शक्यता असल्याने या कालावधीत उकाडा कायम राहणार आहे. येत्या दोन- तीन दिवसांत नगरचे तापमान 36 अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. पावसाच्या शक्यतेने उकाडा वाढल्याचे राहुरी विद्यापीठाचे हवामानतज्ञ देठे यांनी सांगितले.