नगर मुरबाड महामार्गावर कंटेनरची ट्रॅक्टरला धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भरधाव कंटेनरने ट्रॅक्टरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात 30 वर्षांच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. नगर मुरबाड महामार्गावर जनार्दन स्वामी मंदिरामागे पुणतांबा पेट नाका दरम्यान पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. शंकर खंडेराव लोहकणे (30) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

शंकर खंडेराव लोहकणे कारवाडी कोकणठाण (ता. कोपरगाव) येथून पुणतांबा फाट्याकडून कोपरगावकडे नगर-मनमाड महामार्गावरून ट्रॅक्टरने जात होते. शनिवारी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या ट्रॅक्टरला पाठीमागून येणाऱ्या भरधाव कंटेनरने धडक दिली. या धडकेने ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात कोसळला. त्यामुळे ट्रॅक्टरची मागील चाके तुटून निखळली. या अपघातात शंकर लोहकणे याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात शंकर यांचा चुलत भाऊ गोकुळ आप्पासाहेब लोहकणे यांच्या तक्रारीवरून कंटेनर चालकांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास एस. पी. पवार करीत आहेत.