निर्बंध पूर्णत: उठवा, किंवा कडक लॉकडाऊन करा; आरोग्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निर्बंध पूर्णतः शिथिल करण्यात न आल्यामुळे सर्वसामान्य त्रस्त आहेत. त्यामुळे एक तर हे निर्बंध पूर्णतः काढून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा किंवा पूर्ण आणि कडक लॉकडाऊन करावे, अशी विनंती आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली असल्याची माहिती आरोग्यमंत्री  राजेश  टोपे यांनी दिली.

सर्वसामान्यांकडून होत असलेल्या या मागणीकडे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले आहे. जालना येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी याविषयी माहिती दिली. देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱया लाटेचा प्रभाव अजूनही आहे. राज्यात पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक कायम असला, तरी राज्याच्या इतर भागांत कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. मात्र तरीही निर्बंध पूर्णतः शिथिल करण्यात न आल्यामुळे सर्वसामान्य त्रस्त आहेत असे राजेश टोपे म्हणाले.

राज्यात शाळा सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग तयारी करत असले तरी शाळा सुरू करू नये. अद्याप लहान मुलांचे लसीकरण झाले नाही. अशातच तिसरी लाटही तोंडावर आहे. लहान मुलांना कोरोनाचा प्रादुर्भावाचा धोका सर्वाधिक आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्यास अनुकूल नसल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

केंद्रीय आरोग्यमंत्री महाराष्ट्रात येणार

सध्या राज्यात अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा जाणवत आहे. यासंबंधी ठरावही सरकारने केला आहे. विधिमंडळात ठराव करून तो केंद्र सरकारला पाठवला असून, लवकरच आपण नवनियुक्त केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेणार आहे, अशी माहितीही राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

बाहेरून येणाऱयांसाठी 48 तासांतील कोरोना रिपोर्ट आवश्यक

तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून राज्यात प्रवेश करताना बाहेरून येणाऱया नागरिकांना 48 तासांची मुदत असलेला कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल अनिवार्य असणार आहे. तसा प्रस्ताव आरोग्य विभागाने मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे. दरम्यान, ज्यांनी दोन डोस घेतलेले आहेत. त्यांना मात्र राज्यात प्रवेश मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेणार

‘राज्यात अजूनही काही जिह्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. परिस्थिती चिंताजनक असणाऱया त्या भागात निर्बंध जाहीर करावेत. मात्र जिथे परिस्थिती नियंत्रणात आहे तिथे नागरिकांना उद्योग व्यापारासाठी पूर्ण परवानगी द्यावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चेवेळी ही बाब मान्य केली आहे. यावर अभ्यास करून ते लवकरच आपला निर्णय जाहीर करतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.