
सलग दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे संगमेश्वर तालुक्यातील बाजारपेठांमध्ये पुराचे पाणी घुसले असून माखजन बाजारपेठ, कसबा बाजरपेठ, रामपेठ आदी बाजरपेठांमध्ये रविवार संध्याकाळी पाणी घुसण्यास सुरुवात झाली. संध्याकाळी वाढलेल्या पावसामुळे नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांनी रात्र जागूनच काढली. सोमवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढल्याने बाजारपेठेतील दुकाने आणि घरांना धोका वाढला आहे त्यामुळे खबरदारी घेण्यात येत असून ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे.
मुसळधार पावसामुळे असावी, सोनवी, शास्त्री, बावनदी यांचे पुराचे पाणी जवळच्या गावात शिरले आहे. सखल भागात असलेल्या रामपेठ, फूणगुस, माखजन आदी बाजारपेठांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. काही दुकानातून पुराचे पाणी घुसल्याने माल सुरक्षितस्थळी हलविण्यात आला आहे. देवरूख आणि कसबा मार्ग नायरी गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संगमेश्वर देवरुख मार्गावर हनुमान मंदिराजवळ पाणी येण्याची शक्यता असून हा मार्ग बंद तसेच कसबा बाजारपेठेतील मार्गावर पाणी चढल्यास हे दोन्ही मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. शेतीत पुराचे पाणी घुसले असून भातशेतीचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे .
गेले दोन दिवस मुसळधार पावसाने माखजन परिसराला झोडपून काढले आहे. गडनदीला नदीला पूर आला आहे. या पुरामुळे माखजन बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले आहे. आधीच खाडीला आलेली भरती त्यात मुसळधार पाऊस त्यामुळे गडनदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे माखजन बाजरपेठेत पुराचे पाणी शिरले. पुराचे पाणी बाजारपेठेत घुसल्याने व्यापारी धास्तावले आहेत. माखजन कासे आणि कोंडिवरे पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने दुर्गम भागाचा संपर्क तुटला आहे. पुनर्वसू नक्षत्राचा पाऊस राजीवली कुचांबे पाणलोट क्षेत्रात व माखजन आरवली परिसरात जोरदारपणे पाऊस सुरू आहे. यामुळे गडनदीला पूर आला आहे. रविवारी सायंकाळी माखजन बाजारपेठेत पुराचे पाणी शिरायला सुरुवात झाली. मध्यरात्री पावसाचा जोर वाढला. यामूळे पुराचे पाणी बजारपेठेत शिरले. यामुळे व्यापाऱ्यांची धावपळ उडाली. दुकानातील साहित्य मध्यरात्री बाहेर काढण्यात आले. काही व्यापाऱ्यांचे किरकोळ नुकसान झाले.
माखजन कासे आणि कोंडिवरे पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने कासे, नारडुवे, पेढांबे या दुर्गम भागाचा संपर्क तुटला आहे. सखल भागात पुराचे पाणी साचल्याने भात शेती धोक्यात आहे. दरम्यान, मुंबईसह कोकण, मराठवाड्यात दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.



























































