
वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) 12 सप्टेंबर रोजी घेण्यात येईल अशी घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज केली. उद्या सायंकाळी 5 वाजल्यापासून या परीक्षेचे अर्ज राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या (एनटीए) वेबसाईटवर उपलब्ध होणार आहेत.
वैद्यकीय आणि दंतवैद्यक अभ्यासक्रमांना ‘नीट’ परीक्षेच्या माध्यमातून प्रवेश दिले जातात. यंदा कोरोना संकटामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. 1 ऑगस्ट रोजी ती घेतली जाईल असे सांगण्यात येत होते. परंतु जुलै उजाडला तरी त्यासाठी प्रक्रिया सुरू केली न गेल्याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. रमेश पोखरीयाल यांच्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्रीपदाची जबाबदारी आलेल्या धर्मेंद्र प्रधान यांना विद्यार्थी त्याबाबत सतत विचारणा करत होते.

























































