पिंपरखेडला बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद; नागरिकांकडून सुटकेचा निश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिरूर तालुक्यातील पिंपरखेड – भागडी रस्त्यालगत सैद जाधव मळ्यात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली.पिंजरा लावल्याच्या दुसऱ्या दिवशीच बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

पिंपरखेड येथील सैद जाधव मळ्यात व परिसरात बिबट्याचा वावर होता. बिबट्याच्या हल्ल्यात एक मेंढी जखमी झाल्याची घटना घडली होती.त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते. बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे कठीण झाले होते.याबाबत गावकऱ्यांनी पिंजरा लावत बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली होती. तसेच सरपंच राजेंद्र दाभाडे यांनी वनविभागाला पिंजरा लावण्याचे पत्र दिले होते.

वनविभागाने तत्काळ दखल घेत या ठिकाणी पिंजरा लावला. वनविभागाने रविवारी सकाळी लावलेल्या पिंजऱ्यात सोमवारी रात्री 8.30 वाजता बिबट्या अडकला.बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती मिळताच मंगळवारी सकाळी वनविभागाच्या वनरक्षक सविता चव्हाण,वनकर्मचारी विठ्ठल भुजबळ, महेंद्र दाते यांनी घटनास्थळी धाव घेतली व प्रसंगावधान राखून पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याची रवानगी जुन्नर तालुक्यातील माणिकडोह बिबट्या निवारण केंद्रात केली. अंदाजे दहा वर्ष वयाचा बिबट्या असल्याचे वनरक्षक सविता चव्हाण यांनी सांगितले. पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.