छोटा पडदा मोठा धमाका! नव्या मालिकांची बरसात, दिग्गज कलाकारांचे कमबॅक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊनमध्ये चित्रपट, मालिकांना फटका बसला तर दुसरीकडे ओटीटी माध्यमाची ताकद खूपच वाढली आहे. ओटीटीकडे वळलेल्या प्रेक्षकांना पुन्हा आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी टेलिव्हिजन वाहिन्या नवनवीन शक्कल लढवतायत. जुलै आणि ऑगस्टमध्ये छोटय़ा पडद्यावर नवीन मालिका, रियालिटी शोची बरसात होणार आहे. यातून महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, मुक्ता बर्वे, अजिंक्य देव, उमेश कामत, संजय नार्वेकर असे दिग्गज कलाकार छोटय़ा पडद्यावर कमबॅक करणार आहेत.

सोनी मराठी वाहिनीवर सोमवारपासून ‘अजूनही बरसात आहे’ ही मालिका आणि ‘कोण होणार करोडपती’ हा रियालिटी शो भेटीला आला आहे. ‘अजूनही बरसात आहे’ मालिकेत आदी आणि मीरा यांची अनोखी प्रेमकथा पाहायला मिळेल. या मालिकेद्वारे मुक्ता बर्वे आणि उमेश कामत तब्बल आठ वर्षांनी एकत्र झळकणार आहेत. यापूर्वी ’लग्न पहावे करून’ या चित्रपटात ही जोडी झळकली होती. उमेश कामत सात वर्षांनंतर छोटय़ा पडद्यावर दिसणार आहे. ‘कोण होणार करोडपती’ हा रियालिटी शोदेखील भेटीला आला आहे. या शोच्या पहिल्या दोन सिजनचे सूत्रसंचालन सचिन खेडेकर यांनी केले होते. आता सात वर्षांनी ते पुन्हा हॉटसीटवर दिसणार आहेत.

26 जुलैपासून स्टार प्रवाहवर ‘जय भवानी, जय शिवाजी’ मालिका भेटीला येणार आहे. छत्रपती शिवरायांचे स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्या शिलेदारांनी प्राणाची आहुती दिली त्या शिलेदारांच्या शौर्याला या मालिकेतून सलाम करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक मालिकेत बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका अभिनेते अजिंक्य देव साकारणार आहेत. तीन वर्षांनी ते छोटय़ा पडद्यावर कमबॅक करतायत. माझ्या करिअरची सुरुवात सर्जा चित्रपटातील ऐतिहासिक भूमिकेने झाली होती. त्यामुळे बाजीप्रभू साकारताना खूप आनंद होत असल्याचे अजिंक्य देव म्हणाले. छोटय़ा पडद्यावरचा बहुचर्चित रियालिटी शो ‘बिग बॉस मराठी’देखील पुढच्या महिन्यात भेटीला येणार असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच महेश मांजरेकर यांनी शोचा टिझर शेअर करत बिग बॉस येत असल्याची घोषणा केली. ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ मालिकेत इन्सपेक्टर गौतम साळवी यांच्या रुपात सुप्रसिद्ध अभिनेते संजय नार्वेकर यांची एण्ट्री होणार आहे. बऱयाच वर्षांनंतर ते मालिका विश्वात पदार्पण करणार आहेत. एकंदरीत नव्या मालिकांची बरसात आणि दिग्गज कलाकारांचे कमबॅक यामुळे प्रेक्षकांसाठी मात्र पर्वणी ठरणार आहे.

मालिकेसाठी बराच वेळ द्यावा लागतो. सिनेमा आणि नाटक सुरू असल्यामुळे मला तो वेळ मालिकेसाठी देता आला नाही. मात्र आता सुवर्णयोग जुळून आलाय. व्यक्तिरेखा खूप छान आहे आणि वेळेचं गणितही जमून आलं आहे. कोणतंही पात्र साकारताना त्याला वेळ आणि योग्य न्याय देता आला पाहिजे, असं मला वाटतं.
– संजय नार्वेकर, अभिनेता