
गेल्या काही दिवसांत खेड शहर व परिसरात डेंग्युची लागण झालेले रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. यामुळे कोरोनाच्या साथीचा सामना करता करता दमछाक झालेल्या आरोग्य यंत्रणेसमोर आता डेंग्यूला आळा घालण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत खेड तालुक्यातील तब्बल 5671 जण कोरोना संक्रमणाचे बळी ठरले. यापैकी 204 जणांना आपला जीव गमवावा लागला तर 315 जण आजही कोरोनाबाधित म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी उपचार घेत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी आरोग्य यंत्रणेकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, मात्र तरीही रुग्ण कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसत आहेत.
कोरोनासारख्या महाभयंकर साथीला आळा घालता घालता आरोग्य यंत्रणा कोलमडून गेलेली असतानाच तालुक्यात आता डेंग्यूने डोकं वर काढलं आहे. सद्यस्थितीत खेड तालुक्यात डेंग्यू रोगाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.
आरोग्य यंत्रणेने आता डेंग्यूला अटकाव करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी आरोग्य सेवकांकडून कंटेनर सर्व्हेला सुरुवात करण्यात आली आहे. घरात साठवून ठेवलेल्या पाण्यामध्ये डेंग्यूच्या आळ्या आहेत का हे बघण्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. शिवाय घराच्या परिसरात असलेल्या डबक्यामध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्याबाबत नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत. डेंग्यूच्या साथीचा प्रसार होऊ नये यासाठी कोणत्या खबरदाऱ्या घाव्यात याबाबत आरोग्य विभागाकडून जनजागृती केली जात आहे.



























































