दहिसरमध्ये भररस्त्यात वकिलावर तलवारीने हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागेच्या वादातून भरदिवसा वकिलावर 10-15 जणांनी हल्ला केल्याची घटना रविवारी दहिसर परिसरात घडली आहे. सत्यदेव जोशी असे जखमी वकिलाचे नाव आहे. भरदिवसा वकिलावर तलवारीने वार केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी एमएचबी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली.

तक्रारदार हे महाविद्यालयाचे ट्रस्टी आहेत. दहिसरच्या कांदरपाडा येथे एक जमीन आहे. ती जमीन 1983 साली तौकीर खान यांनी देऊबाई ठाकूर यांच्याकडून विकत घेतली होती. 1990 मध्ये त्या जमिनीबाबत तौकीर खान यांनी काशीबाई पाटील यांनी केलेल्या सातबाराच्या नोंदीबाबत कोकण विभागीय आयुक्तांकडे दावा केला होता. 2004 मध्ये कोकण आयुक्तांनी त्या सातबारावर असलेल्या नोंदी चुकीच्या असल्याचा निर्णय दिला होता. त्या निकालाच्या विरोधात 2006 मध्ये पाटील यांच्या वारसदारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेव्हा उच्च न्यायालयाने कोकण आयुक्तांनी दिलेला निकाल नियमित करून ती याचिका फेटाळून लावली होती.

8 जुलैला त्या जमिनीच्या जागेवर दुसऱयाच्या नावाचा उल्लेख केल्याने वाद सुरू आहे. रविवारी तक्रारदार सत्यदेव हे त्या जागेत गेले. जागेची पाहणी करत असताना 10-15 जण हे हातात तलवारी घेऊन आले. हातात तलवारी घेऊन धमकावत जोशींवर तलवारीने वार केले. त्या हल्ल्यात जोशी हे गंभीर जखमी झाले आहेत. तलवारीने हल्ला केल्याचा व्हिडीओ रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्या व्हिडीओची दखल घेत एमएचबी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपास करून पोलिसांनी तिघांना अटक केली. उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे.