संभाव्य तिसऱया लाटेत अधिक जबाबदारीने काम करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारीच्या साथीत आपल्या जीवाची पर्वा न करता सर्व यंत्रणा काम करत आहेत. या सर्वांच्या कामाचा परिपाक म्हणून आपण या महामारीवर मात करीत आहोत. या कामाचे सर्व श्रेय तुमचे आहे, यापुढेही संभाव्य तिसऱ्या लाटेत अधिक जबाबदारीने काम करून कोरोनाचा मुकाबला करू, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

आषाढी वारीनिमित्त शासकीय महापूजेनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सोमवारी सायंकाळी पंढरपुरात आगमन झाले. यानंतर शासकीय विश्रामगृहात आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी जिह्यातील कोरोनाची स्थिती, ऑक्सिजन, लसीकरण आणि संभाव्य तिसऱया लाटेबाबत करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, सोलापूर जिह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे, ही समाधानाची बाब आहे. प्रशासन, आरोग्य विभागाने पहिल्या आणि दुसऱया लाटेत उल्लेखनीय काम केले आहे. मात्र, संभाव्य तिसऱया लाटेबाबत सतर्कता बाळगा. जिह्यात टेस्टिंग आणि ट्रिटमेंटवर भर द्या. नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य द्या. ऑगस्ट, सप्टेंबरपासून लसीचा पुरवठा सुरळीत होईल. ऑक्सिजनची उपलब्धता आणि लागणारी गरज याचे योग्य नियोजन करा. ऑक्सिजनचा अधिक साठा करण्यावर भर द्यावा. अर्थचक्र थांबू नये म्हणून कोरोनाचे नियम पाळून उद्योगधंदे सुरू आहेत. कामगारांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या तसेच खासगी दवाखान्यातून लस घेण्यास परवानगी दिली असल्याने उद्योगांनी कर्मचाऱयांच्या लसीकरणावर अधिकाधिक भर द्यावा.

कोरोनातून बऱया झालेल्या रुग्णांच्या लसीकरणाचे योग्य नियोजन करा. म्युकरमायकोसिसबाबत सतर्कता बाळगा. औषधाचा पुरेसा साठा, इंजेक्शनची कमतरता पडणार नाही याचीही काळजी घ्या, कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेत लहान मुलांना धोका असल्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. याबाबत त्यांच्या उपचारासाठी आवश्यक हॉस्पिटलची निर्मिती, त्यांच्यासाठी लागणाऱया औषधांचा साठा उपलब्ध करून ठेवा, अशा सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

पोलीस आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी पंढरपूरमध्ये ऑक्सिजन आणि आयसीयू 60 बेडचे रुग्णालय सुरू केल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली. पोलीस विभागासाठी आवश्यक असणाऱया सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी मागणी केली. पोलीस विभागाच्या मागणीचा प्राधान्याने विचार करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देऊ, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

महिनाभरात कोरोना रुग्ण नसणाऱया गावांत 6 वी ते 12 वीचे वर्ग सुरू केल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी झाडाखाली, पारावर शाळा सुरू केल्याच्या उपक्रमाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले.

सोलापूरच्या पाण्याचा विषय मार्गी लावणार!

n पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूरच्या पाणीपुरवठय़ासाठी उजनी दुहेरी पाइपलाइनसाठी अजून 103 कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितले. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाण्याचा विषय मार्गी लावण्याची ग्वाही दिली.