पूरग्रस्तांना मदत करणारच! तांत्रिक अडचणी येऊ देणार नाही!! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्तांचे अश्रू पुसले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रलंयकारी पुरामध्ये संपूर्ण संसार वाहून गेलेल्या ग्रामस्थांचे अश्रू पुसण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज चिपळूणमध्ये दाखल झाले. बाजारपेठेची-घरांची पाहणी करून प्रचंड आर्थिक नुकसान झालेल्या चिपळूणवासीयांच्या वेदनांवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. सरकार म्हणून आम्ही कोणालाही वाऱयावर सोडणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांना धीर दिला. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, सांगली व कोल्हापूरमधील नुकसानीचा एकत्र आढावा घेऊन पूरग्रस्तांना मदत जाहीर केली जाईल. मदत करताना कोणतीही तांत्रिक अडचण येऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणमधील पूरपरिस्थितीची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री अॅड. अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, शेखर निकम, मुख्य सचिव सीताराम कुंटे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, माजी मंत्री रवींद्र माने आदी उपस्थित होते.

नुकसानीचा एकत्रित अंदाज

मदतीच्या बाबतीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, आम्ही कोणालाही वाऱयावर सोडणार नाही हे नक्की. अनेकांची घरे आणि संसार वाहून गेली आहेत. व्यापाऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचा एकत्रित अंदाज घेऊन त्यांना सरकार म्हणून जे काही करणे आवश्यक आहे ते आम्ही करू

ग्रामस्थांना जिल्हाधिकाऱयांमार्फत मदत

पुरात नुकसान झालेल्या ग्रामस्थांना तात्काळ मदत केली जाईल. अनेकांकडे अंगावरच्या पंपडय़ाव्यतिरिक्त काही शिल्लक राहिलेले नाही. घरातील धान्य वाहून गेले आहे. म्हणून जिल्हाधिकाऱयांच्या मार्फत तातडीची मदत करीत आहोत. विभागीय आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. अनेकांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. रस्ते वाहून गेले आहेत. काही ठिकाणी पूल वाहून गेले आहेत. मोठे नुकसान झाले आहे त्याचा एकत्रित आढावा घेऊन जे करता येणे शक्य आहे आणि जे आवश्यक आहे ते सर्व करू. मदत करताना तांत्रिक मुद्दे उपस्थित होऊ दिले जाणार नाहीत. ज्यांनी विम्याचे कवच घेतले आहे आणि ज्यांनी विमा घेतलेला नाही त्याचीही वर्गवारी करण्याच्या सूचना आपण दिल्या आहेत. आणि मदत करताना तांत्रिक बाबींची अडचण येणार नाही. याची काळजी सरकार घेईल, असे ते म्हणाले. दोन-चार दिवसांत राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. मात्र तातडीची मदत म्हणून अन्न, औषधे, कपडे इत्यादी अत्यावश्यक वस्तू पूरग्रस्तांना तात्काळ देण्याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱयांना आदेश दिले आहेत, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

हवामान बदल, अडथळे आणि मदतीला विलंब

वातावरणातील बदलाचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुख्यमंत्र्यांसाठी शासकीय हेलिकॉप्टर आहे. पण तरीही मी हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने आलो. कारण हवामान बदल होत आहेत. महाडमधील कालच्या दौऱयात पाऊस होता. ढगाची आवरणं दाट होती, अशा हवामानात एनडीआरएफ, एसडीआरएफच्या टीम पोहोचल्या पाहिजेत. काही ठिकाणी दरडी कोसळल्या त्या ठिकाणी माणसे जाऊ शकत होती. पण यंत्रणा पोहोचण्यासाठी रस्ते नव्हते. रस्ते साफ करणे आणि यंत्रे पोहोचण्यासाठी वेळ लागला हे दुर्दैव असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

केंद्राकडून व्यवस्थित मदत

केंद्र सरकारकडून राज्याला व्यवस्थित मदत मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री व संरक्षण मंत्र्यांशीही माझे बोलणे झाले आहे. एनडीआरएफ, सैन्य दल, हवाई दलाच्या तुकडय़ा राज्याला मदत करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले.

आढावा घेऊन केंद्राकडे मागणी

या मदतीसाठी केंद्र सरकारचे सहाय्य लागेलच. कारण कोविडमुळे नागरिक आणि सरकारचीही आर्थिक परिस्थिती मंदावलेली आहे. पण आताच एवढे कोटी द्या तेवढे कोटी द्या अशी मागणी पेंद्राकडे करणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मदतीसाठी राज्याची स्वतंत्र यंत्रणा

राज्यात वारंवार येणारी संकटांची मालिका पाहिल्यानंतर एनडीआरएफच्या धर्तीवर आणि एसडीआरएफमध्ये आणखी एक स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येईल. बाहेरून मदतीसाठी टीम येईपर्यंत स्थानिक टीम मदतीचे काम सुरू करील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

पूर व्यवस्थापन यंत्रणा

येथील नागरिकांना पाऊस, पूर, पाणी नवीन नाही. पण यावेळेला जे झाले ते अकल्पित होते. पाणी झपाटय़ाने वाढत गेल्याने ग्रामस्थांना आपले सामान व वस्तू वाचवता आल्या नाहीत. पण यापुढे अशा घटना घडू नये म्हणून पूर व्यवस्थापन करणारी योग्य यंत्रणा कार्यान्वित करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

पश्चिम महाराष्ट्राचा आढावा घेणार

पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, शनिवारी मी महाडमधील तळीये गावाची पाहणी केली. नैसर्गिक आपत्तीची अंगावर काटा आणणारी दृश्ये होती. महाड, चिपळूणमधील पाहणी केल्यानंतर आता उद्या सोमवारी मी पश्चिम महाराष्ट्राचाही आढावा घेणार आहे. कारण त्या भागातही पुराचे मोठे संकट आहे. केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी आता लगेच काही घोषणा करणार नाही. राज्यातील पूरपरिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊन नुकसानभरपाई जाहीर करण्यात येईल. पेंद्र सरकारकडूनही काय आणि किती मदत मागायची ते आढावा घेतल्यावरच ठरवता येईल. — मुख्यमंत्री उद्धव ठाकरे