
मोठय़ा प्रतीक्षेनंतर मंगळवारी बारावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला. कोरोनामुळे परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यमापन करून विद्यार्थ्यांचा निकाल लावण्यात आला. दहावीपाठोपाठ बारावीच्या विद्यार्थ्यांनाही भरघोस गुण मिळाले आहेत. राज्यातील तब्बल 99.63 टक्के विद्यार्थी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले असून सायन्स, कॉमर्सबरोबरच आर्टस् शाखेच्या निकालात यंदा भरघोस वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकाल तब्बल 8.97 टक्क्यांनी अधिक लागला आहे. बारावीच्या परीक्षेतही कोकण विभागाने सर्वाधिक निकालाची परंपरा कायम ठेवली असून मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाणही अधिक आहे. विशेष म्हणजे यंदाच्या परीक्षेत सर्वच विभागीय मंडळांचा निकाल तब्बल 4 ते 11 टक्क्यांनी वाढला आहे.
सायन्स, कॉमर्स, आर्टस् आणि एचएससी व्होकेशनल या शाखांतील एकूण 13 लाख 19 हजार 754 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील 13 लाख 19 हजार 754 विद्यार्थ्यांची संपादणूक ज्युनियर कॉलेजकडून शिक्षण मंडळाला मिळाली. यापैकी 13 लाख 14 हजार 965 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्व विभागीय मंडळांतून कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 99.81 टक्के तर सर्वात कमी निकाल संभाजीनगर विभागाचा 99.34 टक्के इतका लागला आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 99.73 तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 99.54 टक्के इतके असून मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा 0.19 टक्क्यांनी जास्त आहे. पुनर्परीक्षार्थींच्या निकालाची टक्केवारी 94.31 इतकी असून 66 हजार 867 विद्यार्थ्यांपैकी 63 हजार 63 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यमापन करून विषयनिहाय गुणदान प्रदान करण्यात आले आहेत. यासाठी दहावीतील परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळवलेल्या तीन विषयांचे सरासरी गुण, अकरावीच्या अंतिम निकालातील विषयनिहाय गुण आणि बारावीतील प्रथम सत्र, सराव, तोंडी परीक्षा आणि इतर मूल्यमापन याआधारे हे गुणदान करण्यात आले आहे.
तक्रारींच्या निराकरणासाठी
अंतर्गत मूल्यमापन पद्धतीद्वारे जाहीर केलेल्या निकालाबाबत विद्यार्थ्यांच्या काही तक्रारी असल्यास त्यांच्या निराकरणासाठी मंडळाच्या स्तरावर व्यवस्था निर्माण करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्या अनुषंगाने राज्य मंडळाने विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी विभागीय मंडळाच्या स्तरावर अधिकाऱयांची नियुक्ती केली आहे. विद्यार्थ्यांना तक्रार नोंदवण्यासाठी टपाल, ई मेल किंवा व्यक्तिशः तक्रार नोंदवता येईल. त्यासाठीच्या अर्जाचा नमुना, तक्रारींचे निराकरण करण्यासाठीच्या अधिकाऱयांची नावे, संपर्क क्रमांक, ई मेल पत्ता आदी माहिती राज्य मंडळाने संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. तक्रारीचा अर्ज केल्यानंतर दहा दिवसांत त्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.
- राज्य 99.63
- कोकण 99.81
- मुंबई 99.79
- पुणे 99.75
- कोल्हापूर 99.67
- लातूर 99.65
- नागपूर 99.62
- नाशिक 99.61
- अमरावती 99.37
- संभाजीनगर 99.34
4 हजार 789 विद्यार्थी अयशस्वी
बारावीचे 4 हजार 789 विद्यार्थी परीक्षेत अयशस्वी ठरले आहेत. ऑनलाइन लेक्चरला गैरहजर राहणे, कॉलेजस्तरावरील परीक्षेत नापास होणे अशा काही कारणांमुळे हे विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. राज्यातील कोरोनाची स्थिती सामान्य झाल्यावर या विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी दिली जाणार असल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले.
- दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 99.59 टक्के.
- 70 विषयांचा निकाल 100 टक्के.
- 99.44 टक्के खासगी विद्यार्थी उत्तीर्ण.
- गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकनाची सुविधा यंदा नाही.





























































