
देशात कोरोनाची दुसरी लाट अजून संपलेली नाही. 8 राज्यांमध्ये ‘आर’ फॅक्टरची डोकेदुखी कायम आहे. केवळ महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांमध्ये याची चिंता कमी झाली आहे. देशातील एकूण 44 जिह्यांचा कोरोना पॉझिटीव्हीटी रेट 10 टक्क्यांपेक्षा अधिक असून 57 जिह्यांमध्ये दररोज 100 नवीन रुग्ण आढळत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी मंगळवारी ही माहिती दिली. त्यांनी याबाबत राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला.
आर फॅक्टरचा (रिप्रोडक्शन नंबर) उपयोग करून कोरोना रुग्णवाढ व सक्रीय रुग्णसंख्येचा अंदाज बांधला जातो. एका संक्रमित व्यक्तीपासून इतर किती लोकांना संसर्ग झाला, याची सरासरी संख्या या फॅक्टरवरून कळते. 8 राज्यांत ही सरासरी वाढल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव अग्रवाल यांनी चिंता व्यक्त केली. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि हिंदुस्थानात सरासरी 1.2 आर नंबर आहे. याचा अर्थ एका संक्रमित व्यक्तीपासून एकापेक्षा अधिक लोक बाधित होत आहेत. यावर नियंत्रण मिळवण्याची गरज आहे, असे अग्रवाल यांनी नमूद केले. तिसऱया लाटेबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी सर्वात आधी आपल्याला दुसरी लाट आटोक्यात आणायची असल्याचे ते म्हणाले. मर्यादित क्षेत्रांमध्येच रुग्णवाढ होत आहे. निर्बंध शिथिल केल्यानंतर जर कोरोना नियमावलीचे पालन झाले नाही तर रुग्णसंख्या वाढू शकते, असाही सावधगिरीचा इशारा त्यांनी दिला.
सक्रीय रुग्णांची संख्या घटली
देशात 10 मे रोजी कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या 37 लाखांच्या घरात गेली होती. ती आता 4 लाखांपर्यंत खाली आली आहे. केवळ एका राज्यामध्ये एक लाखापेक्षा अधिक सक्रीय रुग्ण आहेत, तर 27 राज्यांमध्ये 10 हजारांपेक्षा कमी सक्रीय रुग्ण आहेत, अशी माहितीही अग्रवाल यांनी यावेळी दिली.
आठ राज्यांची चिंता
कर्नाटक, केरळ, हिमाचल प्रदेश, जम्मू कश्मीर, लक्षद्वीप, तामीळनाडू, मिझोराम, पुद्दुचेरी या आठ राज्यांमध्ये ‘आर’ फॅक्टरची चिंता आहे. पश्चिम बंगाल, नागालॅण्ड, मेघालय, हरयाणा, गोवा, झारखंड, एनसीआर येथे आर फॅक्टर स्थिर आहे, तर महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशमध्ये आर फॅक्टरचे प्रमाण कमी झाले आहे.
देशातील 18 जिह्यांमध्ये दररोज अधिक प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत आहेत. यात केरळातील 10, महाराष्ट्रातील 3, मणिपूरच्या 2 तसेच अरुणाचल, मेघालय आणि मिझोरामच्या प्रत्येकी एका जिह्याचा समावेश आहे.
























































