पवईच्या आयआयटीचे अडीच हजारांवर विद्यार्थ्यांना ऑनलाइन पदवीदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयआयटी मुंबईचा 59 वा पदवीदान सोहळा 7 ऑगस्टला दुपारी 2 वाजता होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा ऑनलाइन होणार असून या सोहळ्यात 2215 विद्यार्थ्यांना 2418 पदव्या प्रदान केल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे 352 विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी प्रदान केली जाणार आहे. विशेष म्हणजे ही पदवी स्वीकारताना विद्यार्थ्यांच्या आभासी प्रतिमा ऑनलाइन दिसतील.

या पदवीदान सोहळ्यासाठी आयआयटी मुंबईकडून व्हर्च्युअल रिऑलिटी मोड हे अद्ययावत ऑनलाइन तंत्रज्ञान वापरले जाणार आहेत. पदवी स्वीकारताना प्रत्येक विद्यार्थ्याची ऑनलाइन आभासी प्रतिमा दिसेल. जेणेकरून ऑनलाइन का होईना, पण प्रत्यक्ष पदवी स्वीकारल्याचा आनंद घेता येणार आहे. पदवी देताना आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. सुभाशिष चौधरी आणि सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असलेले टोरोंटो विद्यापीठाचे प्रा. जेफरी हिंटन हेसुद्धा असतील.

  • पदवीदान सोहळ्यासाठी व्हर्च्युअल रिऑलिटी मोडचा वापर करणारी आयआयटी मुंबई ही जगातील पहिलीच संस्था ठरली होती. गेल्या वर्षीचा पदवीदान सोहळाही अशाच प्रकारे पार पडला होता. यंदाच्या वर्षी हा पदवीदान सोहळा पाहण्याची संधी आयआयटी मुंबईने सर्वसामान्यांनाही दिली असून ते ‘यूटय़ूब’ चॅनेलवरून तो सोहळा पाहू शकणार आहेत.