
राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाची पकड सैल होत असल्याने कडक निर्बंध हटविण्यात आले. काही ठिकाणी शाळादेखील सुरू झाल्यानंतर आता राज्यातील कॉलेज सुरु करण्याची चाचपणी उच्च व तंत्र शिक्षण विभाग करीत आहेत. येत्या 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील कॉलेज सुरू करण्याचा विचार असल्याची माहिती आज राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
देशातील विद्यापीठ आणि कॉलेज सुरु करण्याबाबत काही दिवसांपूर्वीच विद्यापीठ अनुदान आयोगाने नियमावली जाहीर केली होती. त्यानंतर राज्यातील विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत नव्या शैक्षणिक वर्षात कॉलेज सुरू करण्याबाबत प्रत्येक विभागातील कुलगुरूंना जिल्हाधिकाऱयांशी बोलून कोरोनाचा आढावा घेण्याची सूचना करण्यात आली आहे. येत्या 15 दिवसांत यासंदर्भातील आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल अशी माहिती सामंत यांनी दिली.
























































