देवरूख-भायजेवाडीतील बंद घर फोडले, अज्ञात चोरट्यां विरोधी गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवरुख नजीकच्या भायजेवाडी येथील बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून रोख रकमेसह 35 हजार 670 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे . याबाबत अज्ञात चोरट्यांवर देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, याबाबतची फिर्याद संतोष द्वारकानंद देवरुखकर यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. देवरुखकर कुटुंबीय 12 जुलै 2021 रोजी घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. ते पुन्हा घरी आले असता, बंद घराच्या समोरील लोखंडी दरवाजाचे कुलूप उचकटलेले दिसून आले. तसेच घरात प्रवेश केला असता, रोख रक्कम व गृहोपयोगी साहित्य गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. 25 हजार रुपये रोख रक्कम सॅमसंग कंपनीचा एलईडी टीव्ही, सिलेंडर टाकी, कुकर मिक्सर, चांदीचे नाणे, चांदीची गणपतीमूर्ती, पोरसेलिनची राधाकृष्णाची मूर्ती, घड्याळ, बेडशीट, सोलर लॅम्प असे एकूण 35 हजार 670 रुपयांचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे संतोष देवरुखकर यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

घटनेची माहिती मिळताच देवरुख पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी व पंचनामा केला. देवरुखकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यां विरोधात देवरुख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल डी. एस. पवार करीत आहेत.