
चिपळूण येथे उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे नागरिकांच्या घरांमधील वीजेच्या उपकरणात आणि वीज जोडण्यांमध्ये पाणी गेल्याने त्या नादुरुस्त झाल्या आहेत. नुकसान झालेल्या घरांमधील वीजेची दुरुस्ती करून देण्यासाठी कुडाळ व मालवण तालुक्यातील शिवसेना सरपंच संघटना व आमदार वैभव नाईक यांनी पुढाकार घेत 100 इलेक्ट्रिशियनची टीम चिपळूणमध्ये पाठविली आहे. कुडाळ व मालवण येथून पाठविण्यात आलेली ही टिम चिपळूणला पोहचली आहे. या टिममार्फत तेथे युध्दपातळीवर वीजदुरूस्ती, जोडणी आणि अंतर्गत मदतकार्य करण्यात येणार असल्याचे सरपंच संघटनेकडून सांगण्यात आले.
या टिमने शुक्रवारी सकाळपासून कामाला सुरुवात केली आहे. शनिवारीही ही टिम मदतकार्य करणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त लोकांच्या घरांमध्ये वीज दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. वीज जोडणीसाठी आवश्यक असणारे साहित्य वायर, बल्ब, केसिंग पट्टी, होल्डर,स्विच, ट्रीपर, आदी वस्तू सोबत नेण्यात आल्या आहेत. सामाजिक बांधिलकीतून हे मदतकार्य केले जात आहे. ही टिम गुरुवारी सायंकाळी चिपळूणला रवाना करण्यात आली होती.
यावेळी कुडाळ येथे आमदार वैभव नाईक, कुडाळ शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, उपसभापती जयभारत पालव, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, जिल्हा परिषद सदस्य राजू कविटकर, वर्षा कुडाळकर, संजय भोगटे आदींसह शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

























































