पुण्यात पीएमपीएल बसप्रवासात ज्येष्ठ महिलेचे दागिने लंपास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यातील पीएमपीएल बसप्रवासात महिलांचे दागिने लंपास करण्याचे सत्र सुरुच आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लक्ष्मी रस्ता ते कर्वेनगर असा प्रवास करणाऱ्या जेष्ठ महिलेच्या हातातील 75 हजारांची सोन्याची बांगडी चोरण्यात आली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

तक्रारदार जेष्ठ महिला प्रभात रस्ता परिसरात राहायला आहेत. मागील आठवड्यात महिला कामानिमित्त लक्ष्मी रस्ता परिसरात गेल्या होत्या. त्यानंतर तेथील बसथांब्यावरून महिला पीएमपीएल बसने कर्वे रस्त्याकडे चालल्या होत्या. त्यावेळी बसमध्ये गर्दी असल्याची संधी साधत चोरट्याने त्यांच्या हातातील 75 हजारांची सोन्याची बांगडी कटरच्या सहाय्याने कापून नेली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब झरेकर अधिक तपास करत आहेत.

बसमधील प्रवासी संख्येवरील निर्बंध कमी झाल्यानंतर प्रवासी संख्या वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून पीएमपीएल बस प्रवाशांकडील ऐवज तसेच रोकड लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गर्दीच्या मार्गावरील बसमध्ये चोरटे शिरून महिला प्रवाशांच्या पिशवीतील दागिने तसेच बांगड्या लांबवितात. चोरट्यांनी ज्येष्ठ महिलांना लक्ष्य केले असून कटरचा वापर करून बांगड्या चोरण्यात येत आहेत.