
बेलवंडी पोलिसांनी अवैधपणे होणाऱया गोमांसाची वाहतूक उघड केली असून, 1 लाख 65 हजारांचे 550 किलो गोमांस व कार हस्तगत केली आहे. याप्रकरणी दोनजणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश रोहिदास गोरडे (रा. सावरगाव, ता. जुन्नर, जि. पुणे) व रोशन मधुकर गुरसाळे (रा. जामरुंग रोड, जि. रायगड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.ना
काबंदी व शोध मोहिमेत पोलीस रेकॉर्डवरील फरारी आरोपी पकडण्यासाठी विशेष मोहीम सध्या सुरू आहे. यावेळी नगर-पुणे रस्त्यावरून गोमांस वाहतूक होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे नगर-पुणे रस्त्यावरील गव्हाणेवाडी येथे नाकाबंदी करून संशयित महिंद्रा मांझा कार थांबवून पोलिसांनी तिची तपासणी केली. त्यावेळी कारमध्ये 1 लाख 65 हजार रुपये किंमतीचे 550 किलो गोमांस आढळून आले. पोलिसांनी गाडीचा चालक योगेश गोरडे व रोशन गुरसाळे यांना ताब्यात घेऊन अटक केली. हवालदार संतोष गोमसाळे यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार ज्ञानेश्वर पठारे तपास करीत आहेत.
फरार आरोपीलाही अटक
दरम्यान, ही शोधमोहीम चालू असताना मध्यरात्री 3 च्या सुमारास बेलवंडी पोलीस ठाण्यात विविध गुह्यांतील फरार आरोपी चंद्रकांत भाऊसाहेब घावटे (रा. शेळकेवाडी, राजापूर, ता. श्रीगोंदा) यालादेखील अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संपत शिंदे करीत आहेत.

























































