
स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. किल्ल्यामध्ये महात्मा गांधी, भगत सिंह, सुभाषचंद्र बोस आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मोठ्या पेटिंग लावण्यात आल्या आहेत. तसेच सॅटेलाईट इमेज आणि सैन्याच्या जवानाच्या साहसाचे प्रदर्शन करणाऱ्या पेटिंगही लावण्यात आल्या आहेत. या 75 व्या स्वातंत्र्यदिनाची संकल्पना (थिम) ‘राष्ट्र प्रथम, सदैव प्रथम’ अशी आहे. 26 जानेवरीच्या शेतकरी आंदोलकांच्या हिंसाचाराच्या घटनेनंतर लाल किल्ल्याच्या परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
आंदोलकांना किल्ल्यात प्रवेश करता येऊ नये, यासाठी प्रवेशद्वाराजवळ मोठेमोठे कंटेनर ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेला चकवा देत कोणी आत शिरलेच तर त्यांना हे कंटेनर पार करता येणार नाहीत, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. लाल किल्ल्याचे सुरक्षा कवच असणारे हे कंटेनर मोठमोठ्या पेटिंगने सजवण्यात आले आहेत. देशाच्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे दर्शन या पेटिंगमधून दिसून येत आहे. तसेच महात्मा गांधी, भगत सिंह, सुभाष चंद्र बोस आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पेटिंगही लावण्यात आल्या आहेत.
स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याची सुरक्षा व्यवस्था एनएसजी,एसपीजी, पॅरामिलिट्री फोर्सचे जवान आणि दिल्ली पोलिसांकडे देण्यात आली आहे. लाल किल्ला आणि परिसरात सुमारे 40 हजार जवान तैनात करण्यात येणार आहेत. लाल किल्ला आणि परिसरात अँटी ड्रोन यंत्रणेची संख्या वाढवून ती 9 करण्यात आली आहे. या यंत्रणा कोणेतही ड्रोन, पॅराग्लाइडिंगसारख्या संशयास्पद उपकरणांना लक्ष्य करण्यास सक्षम आहेत.एनएसजीचे कमांडो लालकिल्ल्याच्या परिसरात 30 पाँइटवर तैनात करण्यात आले आहेत.
लाल किल्ला आणि परिसरात 15 ठिकाणी स्नायपर तैनात करण्यात आले आहेत. ते अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज असतील. संशयास्पद व्यकी किंवा दहशतवाद्यांना टिपण्यात ते निष्णात आहेत. तसेच लालकिल्ला आणि परिसरात 5 एअर डिफेन्स गनही तैनात करण्यात येणार आहेत. किल्ल्याच्या परिसरात 350 इमारतींवर विशेष छत बनवण्यात आले आहेत. तेथे दिल्ली पोलिसांचे जवान तैनात करण्यात येणार आहेत. त्यांच्याकडे लाल आणि सफेद अशा दोन रंगाचे झेंडे देण्यात येणार आहेत. कोणताही धोका किंवा संशयास्पद हालचाल जाणवल्यास ते लाल झेंडा दाखवत इशारा करतील. हा इशारा मिळताच सर्व यंत्रणा सतर्क होणार आहेत.
स्वातंत्र्यदिनी दिल्लीत पतंग उडवण्याची पंरपरा आहे. मात्र, स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम सुरू असेपर्यंत दिल्लीत पतंग उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. परिसरात याची सूचना देण्यात आली आहे. तसेच स्वातंत्र्यदिनी लाल किल्ला आणि परिसर ‘नो काइट्स झोन’ घोषित करण्यात आला आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे यंदाच्या सोहळ्यात आमंत्रितांची संख्या कमी आहे. 1500 जणांना सोहळ्याचे आमंत्रण पाठवण्यात आले आहे. सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाबाबतचे इतर निर्बंध पाळत मान्यवर सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंनाही आमंत्रित करण्यात आले आहे.


























































