
पुणे जिल्ह्यात बिबट्याने एका शेतकर्यावर हल्ला केला. या हल्ल्यात शेतकरी बचावले असून बिबट्यामुळे संपूर्ण गावात भितीचे वातावरण आहे.
शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथे राहणारे शेतकरी लहू म्हातारबा मेरगळ हे पहाटे ३ च्या सुमारास कुत्र्यांच्या भुंकण्याने जागे झाले. मेरगळ घराबाहेर आले आणि बॅटरीच्या उजेडात पाहिले असता एक बिबट्या खुराड्यात असलेल्या कोंबड्यांवर ताव मारीत असल्याचे त्यांनी पाहिले. या बिबट्याला लहू यांनी कुत्र्याच्या सोबतीने हाकलण्याचा प्रयत्न केला परंतु गुरगुरणाऱ्या बिबट्याने थेट लहू मेरगळ यांच्यावरच हल्ला केला. त्यांनी तात्काळ घरात जात दरवाजा बंद केला. तर याच बिबट्याने घराच्या दरवाज्यापर्यंत झेप घेत हल्ला केल्याचे मेरगळ यांनी सांगितले. नशीब बलवत्तर म्हणून ते या हल्ल्यातून थोडक्यात बचावले.
दरम्यान अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत लहू मेरगळ यांनी फोनवरून बाजूच्या शेतकऱयांना सावध केले. तर त्यांच्या पत्नी तुळसाबाई मेरगळ यांनी बिबट्या आपल्या पतीवर हल्ल्याच्या प्रयत्नात असल्याचे पाहून प्रचंड आरडा ओरडा केला. तेव्हा शेजारी राहणारे ग्रमास्थ मदतीसाठी धावले आणि बिबट्याला हाकलून लावले.
गावात बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. संध्याकाळी सात नंतर कोणीही घराबाहेर पडात नाही. त्यामुळे वन विभागाने या परिसरात तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी केली आहे.
























































