‘जामीन मिळाल्यास बोठे फरार होऊ शकतो’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर, दि. 11 (प्रतिनिधी) – रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठे याची जामिनावर सुटका झाली, तर तो फरार होऊ शकतो, अशी भीती सरकार पक्षाच्या वतीने न्यायालयासमोर व्यक्त करण्यात आली. दरम्यान, जामीन अर्जावर बोठेच्या वकिलांनी म्हणणे मांडण्यास मुदत मागितल्याने यावर पुढील सुनावणी मंगळवारी (दि. 17) होणार आहे.

आरोपी बोठे याचे वकील ऍड. तवले यांनी न्यायालयात म्हणणे सादर करण्यासाठी मुदत वाढवून मागितली होती. त्यावर सरकारी वकील ऍड. यादव यांनी आपले म्हणणे न्यायालयाने ऐकून घ्यावे व त्यावेळेस आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात उपस्थित राहावे, असे म्हणणे मांडले. न्यायालयाने ते मान्य करून यादव यांना म्हणणे सादर करण्यास सांगितले. त्यानंतर ऍड. यादव यांनी युक्तिवाद केला.

ऍड. यादव म्हणाले, जरे यांना मारण्यासाठी दोन वर्षे प्रयत्न करण्यात आले. पहिल्यांदा 24 नोव्हेंबर रोजी प्रयत्न फसल्यानंतर 30 नोव्हेंबर रोजी सुपारी देऊन त्यांचा खून करण्यात आला. दरम्यान, खुनाच्या घटनेनंतर अटकेच्या भीतीने बोठे याने शंभरपेक्षा जास्त दिवस तेलंगणा राज्यात आश्रय घेतला होता. बोठेला कायदेशीर ज्ञान आहे. घटनेअगोदर आणि त्यानंतरचे वर्तन लक्षात घेऊन त्याला जामीन देऊ नये, अशी मागणी ऍड. यादव यांनी केली.