
मुंबईत दररोजची रुग्णसंख्या आता 200 च्या आत यायला सुरुवात झाली असताना मार्च 2021 नंतर आज पहिल्यांदाच मृत्यू दराची नीचांकी नोंद झाली. मुंबईत आज दोघा जणांचा मृत्यू झाला. दोघांनाही कोणताही आजार नव्हता. यातील एक पुरुष तर एक महिला असून एकाचे वय 40 ते 60 दरम्यान होते तर एकाचे वय 60 च्या पुढे होते. दरम्यान, आज कोरोनाचे 198 रुग्ण सापडले.
कोरोनाच्या दुसऱया लाटेत फेबुवारीच्या मध्यावर झपाटय़ाने रुग्णनोंद होऊ लागले. दररोज दहा हजारांवर रुग्ण आणि 60 ते 70 मृत्यू होत होते. त्यामुळे पालिकेकडून कोरोना रोखण्यासाठी कोरोना चाचण्या आणि लसीकरणावर भर देण्यात आला. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाटही नियंत्रणात आली असून दैनंदिन रुग्णसंख्या आणि मृत्यूही घटले आहेत. कोरोनाच्या दुसऱया लाटेत दररोजची रुग्णसंख्या कमी होत असताना आता कोरोनामुळे होणाऱया दररोजच्या मृत्यूंचे प्रमाणही कमी होत आहे. मुंबईत या आधी 24 मार्चला 8 मृत्यू तर 8 जूनला 7 इतके नीचांकी मृत्यू नोंदवले गेले होते. रुग्णसंख्या कमी झाल्याने रुग्ण दुपटीच्या कालावधीतही वाढून 1,986 दिवसांवर पोहोचला तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्क्यांवर पोहोचले आहे.
लसीकरणात मुंबई पुन्हा लखपती
मुंबईने आज पुन्हा लसीकरणात लाखाचा आकडा गाठला. मुंबईत आज 1 लाख 5 हजार 842 जणांचे लसीकरण झाले. यात नोकरी आणि शिक्षणासाठी परदेशी जाणाऱया 403 जणांचा आणि अंथरुणाला खिळलेल्या 92 जणांचा समावेश आहे. मुंबईत आतापर्यंत 60 लाख 96 हजार 975 जणांनी पहिला तर 20 लाख 61 हजार 396 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. मुंबईत आतापर्यंत 3 ते 4 वेळा लाखांचे तर 14 ऑगस्टला एकाच दिवशी 2 लाखापेक्षा जास्त लोकांचे लसीकरण झाले आहे.



























































