
नीरा उजव्या कालव्यातून सोडलेले पाणी व सतत पडणाऱया पावसामुळे सलग तिसऱया वर्षी चिंचोली तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. यंदा परतीच्या पावसापूर्वीच चिंचोली तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकरीवर्गासह पशुपालकांत आनंदाचे वातावरण आहे.
चालू वर्षी मान्सूनपूर्व पावसासह मृग, आर्द्रा, पुनर्वसू व पुष्य या नक्षत्रांतील पावसाने समाधानकारक हजेरी लावल्यामुळे तालुक्यात शेतकरीवर्ग सुखावला आहे. दरम्यान, गतवर्षी परतीच्या पावसापूर्वी नीरा उजव्या कालव्यातून चिंचोली तलावात पाणी सोडले व त्यानंतर झालेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळे चिंचोली तलाव 100 टक्के भरल्याने सांडव्यावरून पाणी वाहिले होते. त्यामुळे उन्हाळ्यात चिंचोली लाभक्षेत्रातील शेतीला व जनावरांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले नाही. चालू वर्षी मोसमी पावसासह सर्वच नक्षत्रांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे.
पावसाळ्यापूर्वी आमदार शहाजीबापू पाटील यांनी उन्हाळी आवर्तनातून नीरा उजव्या कालव्यातून तालुक्यातील सर्व तलाव-बंधारे पाणी सोडून भरून देण्याच्या सूचना नीरा उजवा कालवा कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग फलटण यांना केल्या होत्या. त्यानुसार नीरा उजव्या कालव्यातून सोडलेल्या 70 टक्के पाण्यातून, तर चिंचोली तलावाच्या लाभक्षेत्रात पश्चिमेकडील बाजूस सतत पडणाऱया पावसामुळे 30 टक्के पाण्यातून सलग तिसऱया वर्षी चिंचोली तलाव 100 टक्के भरला आहे. तलावाच्या पूर्व बाजूकडील ओढय़ावरील सर्व बंधारे ओव्हरफ्लो झाल्याने त्यातूनही पाणी वाहत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
शेतीसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मिटला
चिंचोली तलाव 100 टक्के भरल्याने तलावाचे लाभक्षेत्र ओलिताखाली येणाऱया एखतपूर, सांगोला (बिलेवाडी), बामणी, चिंचोली येथील 1800 एकर शेतीच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. सध्या तलावात 92.27 दलघफू पाणीसाठा तयार झाल्याने सांडव्यावरून पाणी वाहत आहे.























































