
कोरोना लसीकरण मोहीमेत ऑनलाईन नोंदणीत हॅकींग झाल्याचा प्रकार समोर आला आहे. लस न घेताच प्रमाणपत्र मिळविण्यासाठी एकाच कुटुंबातील 16 जणांची नावे डीकेएमएम लसीकरणाच्या वेबसाईडमध्ये घुसविण्यात आल्याचे डाटा ऑपरेटरच्या सतर्कतमुळे उघडकीस आले. या प्रकरणी मनपाने चौकशी सुरू केली.
शहरातील आरेफ कॉलनी आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या डीकेएमएम लसीकरण केंद्रावर शनिवार, 28 ऑगस्ट रोजी हा प्रकार घडला. या आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉ. अंबरीन यांनी या प्रकरणीत तक्रार दिल्याची माहीती डॉ. पारस मंडेलचा व डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. या संदर्भात माहिती देतांना डॉ. पाडळकर म्हणाल्या की, शहरात लसीकरण मोहीम राबवली जात आहे. नागरिकांकडून देखील लसीकरणाला प्रतिसाद मिळत आहे. शनिवारी शहरातील 56 केंद्रावर लसीकरण सुरू होते. रोजच्या प्रमाणे डिकेएमएम महाविद्यालयाच्या लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी केंद्रावर गदीँ होत होती. पहिल्या टप्यात 55 टोकन वाटण्यात आले होते. टोकन दिलेल्या प्रत्येक व्यक्तींची नोंदणी रजिस्टर मध्ये करुन त्यानंतर डीकेएमएमच्या कोवीन पोर्टलमध्ये त्याची नोंद घेतल्या जात होती. 55 जणांचे लसीकरण झाल्यानंतर डाटा ऑपरेटर शकील खान यांनी सगळ्या नोंदणी बरोबर झाल्या आहेत का हे पहाण्यासाठी अँप तपासले तेव्हा त्याना 71 नोंदणी जणांनी लस घेतल्याचे दिसून आले. त्यांनी ही माहीती टास्कफोर्सचे तांत्रिक विभागाचे प्रमुख हेमंत राठोड यांना दिली. त्यांनी तात्काळ या केंद्रावरील लसीकरण थांबवले व ही माहीती मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडेलचा, डॉ. नीता पाडळकर आणि अतिरीक्त आयुक्त बी. बी नेमाने यांना दिली. प्रथम दर्शनी लस न घेता केवळ प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काही लोकांनी अॅपचा पासवर्ड हॅक करत किंवा मिळवत अशा प्रकारची नोंदणी केली असावी असा संशय आहे. आता पर्यंत या ठिकाणचे ऑपरेटर शकील हे ऑनलाईन नोंदणीसाठी त्यांचा स्वत:चा लॅपटॉप वापरत होते. मात्र शनिवारी पहिल्यांदा महाविद्यालयाच्या संगणकातून नोंदणी करण्यात सुरुवात करण्यात आली होती. बेगमपुरा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. विशेष म्हणजे एकाच.कुटुंबातील 16 सदस्यांची नावे असल्याचे समोर आल्याचे कळते.
मनपा चौकशी करणार
डीकेएमएम केंद्राचे पोर्टल हँक करून लस न घेताच प्रमाणपत्र घेण्यासाठी नाव नोंदणी होत असल्याचे निदर्शनास येताच महापालिकेच्या आरोग्य विभागाने डाँ. मनिषा भोंडवे,.डॉ मेघा जोगदंड, हेमंत राठोड यांच्या मार्फत चौकशी केली जाणार असल्याचे डॉ नीता पाडळकर यांनी.सांगितले.
यापूर्वीच आरोग्य विभागाला होती माहिती
वेब पोर्टल हॅक करुन लस न घेता प्रमाणपत्र घेतले जात असल्याचे समोर आले होते. मात्र या संबंधी कोणतीही.तक्रार नव्हती. त्यामुळे आरोग्य विभागाने दुर्लक्ष केले होते. मात्र आता हा प्रकार समोर येताच आरोग्य विभागाचे डोळे उघडले.
























































