
तयार होणारी वीज महावितरण नेटमिटरिंगद्वारे खरेदी करणार
राज्यातील घरगुती वीज ग्राहकांसाठी खुशखबर आहे. आपल्या घराच्या छतावर रूफ टॉप सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी एकूण खर्चापैकी तब्बल 40 टक्क्यांचे अनुदान केंद्रीय अपारंरिक ऊर्जा विभागाकडून मिळणार आहे. तसेच या सौर प्रकल्पात तयार होणारी वीज महावितरण बाजारभावाने खरेदी करणार आहे. त्यामुळे सदरचा प्रकल्प उभारणाऱ्या घरगुती ग्राहकांच्या वीज बिलाच्या खर्चात मोठी बचत होणार आहे.
महावितरणचे राज्यभरात जवळपास पावणेदोन कोटी घरगुती वीज ग्राहक आहेत. त्यांच्या घराच्या छतावर सौर प्रकल्प उभारण्यासाठी केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा विभागाने रूफ टॉप योजने अंतर्गत तब्बल 25 मेगावॅटचे सौर प्रकल्प उभारण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार ग्राहकांना एक किलोवॅटपासून दहा किलोवॅट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. तीन किलोवॅटपर्यंत क्षमता असलेल्या सौर प्रकल्पासाठी 40 टक्के अनुदान मिळणार आहे. एक किलोवॅटचा सौर प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे 46 हजार रुपये खर्च अपेक्षित असून त्यापैकी 20 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. तर तीन किलोवॅटच्या पुढील प्रकल्पासाठी वीस टक्के अनुदान मिळणार आहे. तर हौसिंग सासायाट्यांना पाचशे किलोवॅटपर्यंतचा सौर प्रकल्प उभारता येणार असून त्यांना दहा टक्के एवढे अनुदान मिळणार आहे. या प्रकल्पांत तयार होणारी वीज संबंधित ग्राहकाने वापरून शिल्लक राहिल्यास ती नेटमिटरिंगच्या माध्यमातून महावितरणला पुरवली जाणार आहे.
पाच वर्षे देखभाल, दुरुस्ती प्रकल्प उभारणारी एजन्सी करणार
घराच्या छतावर सौर प्रकल्प आणि त्याची यंत्रणा उभारण्यासाठी महावितरणने परिमंडळनिहाय एजन्सी नेमल्या आहेत. वन टाइम खर्च करून प्रकल्प उभारल्यानंतर पुढील पाच वर्षे त्याची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित एजन्सीवर असणार आहे. त्यामुळे ग्राहकाचा आर्थिक भुर्दंडापासून बचाव होणार आहे.



























































