राहुरीत विहिरीत पडलेल्या बिबटय़ाला जीवदान, राहुरी वन विभागाचे यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भक्ष्याच्या शोधात 40 फूट खोल विहिरीत पडलेल्या एक वर्षाच्या बिबटय़ाला सहीसलामत बाहेर काढण्यात वन विभागाच्या अधिकाऱयांना यश आले. बिबटय़ाला बाहेर काढल्यानंतर उपस्थित नागरिकांनी टाळय़ा वाजवून अधिकाऱयांचे स्वागत केले.

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील भाऊसाहेब हारदे यांच्या 40 फूट खोल विहिरीत बुधवारी रात्री बिबटय़ा पडला होता. आज सकाळी विहिरीतील पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱयाला विहिरीच्या कपारीला बसलेला बिबटय़ा दिसला. याची माहिती समजताच नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली. बिबटय़ा विहिरीत पडल्याची माहिती मिळताच प्रभारी वनक्षेत्रपाल सचिन गायकवाड, वनपाल भगवानसिंग परदेशी, वनरक्षक नीलेश कोळी, कर्मचारी ताराचंद गायकवाड, प्रमोद कोहकडे, सुनील अमोलिक यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱयांच्या मदतीने वन विभागाच्या अधिकाऱयांनी विहिरीत पिंजरा सोडला.

जवळपास 40 फूट खोल असलेल्या विहिरीत कपारीला बसलेला बिबटय़ा पिंजऱयात जेरबंद झाला. या बिबटय़ाला विहिरीतून सहीसलामत बाहेर काढताच उपस्थित शेतकऱयांनी टाळ्यांचा कडकडाट करत वन विभागाच्या अधिकाऱयांचे स्वागत केले. बिबटय़ाला राहुरीच्या डिग्रस नर्सरीत हलविण्यात आले असून, प्राथमिक उपचारानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे, असे अधिकाऱयांनी सांगितले.

बिबटय़ा सापडण्याची सहावी घटना

जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत राहुरी तालुक्यात जिवंत बिबटय़ा सापडण्याची ही सहावी घटना आहे. यापूर्वी चेडगाव, ब्राम्हणी, कात्रड, देवळाली प्रवरा येथील परिसरात बिबटय़ाला पिंजऱयात जेरबंद तसेच विहिरीत पडलेल्या बिबटय़ाला बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात वन विभागाच्या अधिकाऱयांना यश आले आहे.